Sunday, September 6, 2026
Homeनगरकालवा दुरुस्तीमुळे सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होईल

कालवा दुरुस्तीमुळे सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होईल

प्रवरा डावा-उजवा कालव्याच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ

आश्वी |वार्ताहर| Ashwi

- Advertisement -

‘गाळमुक्त धरण आणि अतिक्रमणमुक्त कालवा’ असे धोरण जलसंपदा विभागाने घेतले असून, राज्यातील उजनी, जायकवाडी आणि मुळा धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाच्या कामामुळे पाणीगळती कमी होऊन कालव्यांची पाणीवहन क्षमता वाढून सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जलसंपदा विभागाने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत आश्वी (ता.संगमनेर) येथील प्रवरा डावा-उजवा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (दि.8) पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास निवृत्त सनदी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक बाळासाहेब शेटे, अहिल्यानगरचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी धरणातील पाण्याची साठवण क्षमता वाढवावी लागेल. यासाठी राज्यातील उजनी, जायकवाडी आणि मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. तीन धरणांतील गाळ काढला गेला तर 15 ते 20 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. जिल्ह्यातील गोदावरी कालव्यांसाठी 400 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याचेही काम आता वेगाने पूर्ण होत आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणालाही आता बोगद्याची जोड देऊन पाण्याचे वहन केले जाणार असून, पाण्याचा अपव्यय टाळणे हाच यामागचा उद्देश असल्याचे स्पष्ट करून, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर पारंपरिक पाण्याचे स्रोत, आढे-नाले अतिक्रमणमुक्त करावे लागणार असून, यासाठी सुद्धा जलसंपदा विभागाने विशेष मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील महायुती सरकार शेतकर्‍यांसाठीच सर्व निर्णय घेत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची केवळ घोषणा केली नाही, तर प्रत्यक्ष तिची अंमलबजावणी झाली आहे. 48 हजार कोटी रुपयांचे वीजबिलही माफ झाले असून, आश्वी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच जलसंपदा विभागाच्या आश्वी येथील विश्रामगृहाच्या इमारतीचे नूतनीकरणही करण्यात येणार असून, यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

Video : वैभव सूर्यवंशी-तिलक वर्मा यांच्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची; अंपायरला करावी...

0
चेन्नई | Chennai चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ईस्ट झोनचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि...