अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
धनगरवाडी (ता. अहिल्यानगर) येथे घरासमोर अवैधरित्या गांजाची झाडे लावून त्याची लागवड करणार्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन लाख 23 हजार 650 रूपये किमतीचा 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अनिल लक्ष्मण विरकर (वय 49, रा. धनगरवाडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनगरवाडी येथे एका व्यक्तीने घरासमोर गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, प्रभारी सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांचे पथक धनगरवाडी येथे रवाना झाले. पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका घरासमोर गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले.
त्याठिकाणी राहत असलेल्या अनिल विरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घरासमोर अवैधरित्या लागवड केलेली गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, अंमलदार सुदाम लोंढे, सुशांत दिवटे, सचिन हरदास, उमेश शेरकर, सुरज देशमुख आणि अक्षय रोहोकले यांच्या पथकाचा सहभाग होता.




