अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली पोलिसांनी रात्रभर सिनेस्टाईल कारवाई करत छत्रपती संभाजीनगरमार्गे केडगाव परिसरात आलेल्या एका मालट्रकमधून गांजाची तस्करी करणार्या टोळीवर कारवाई करत, सुमारे 19 लाख 90 हजार रूपये किमतीचा गांजा, तीन वाहने आणि 11 मोबाईलसह एकूण 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात एकूण 10 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी एक संशयित उडीसा येथील गांजा वितरक तपासात निष्पन्न झाला आहे.
गुरूवारी (19 जून) रात्री 10 वाजता सुरू झालेली कारवाई दुसर्या दिवशी शुक्रवारी (20 जून) पहाटेपर्यंत सुरू होती. काही व्यक्ती मालट्रकमधून गांजा आणून तो केडगाव परिसरातील स्थानिक खरेदीदार लोकांना वितरीत करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलीस उपअधीक्षक भारती यांच्याशी संपर्क साधून छाप्याची योजना आखली. उपअधीक्षक भारती यांनी स्वतः उपस्थित राहून छापा टाकण्याची कार्यवाही मार्गदर्शित केली. पोलिसांनी केडगाव बायपासजवळ भारत बेंझ शोरूमजवळ सापळा लावला. रात्री 10.40 वाजता एमएच 16 सीजी 0452 क्रमांकाचा ट्रक संशयास्पदरीत्या पुढे जाताना दिसताच, त्याला थांबवून झडती घेण्यात आली.
ट्रकमध्ये वरच्या भागात 4 गोण्या आढळून आल्या ज्यात खाकी टेपमध्ये पॅक केलेले गांजाचे पॅकेट्स सापडले. ट्रक चालक संतोष प्रकाश दाणवे (रा. वाळवणे, ता. पारनेर) याने गांजाबाबत कबुली देताना सदरचा गांजा बहिरमपुर, उडीसा राज्यातुन आणाला असल्याचे सांगितले. फोनवरील संभाषणाच्या आधारे पोलिसांनी पुढील सापळा रचला. काही वेळातच एमएच 16 सीव्ही 2786 आणि एमएच 12 सीडी 3127 या दोन चारचाकी कार गांजा घेण्यासाठी आल्या. अंधारात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी या कारमधील 7 जणांना ताब्यात घेतले. ट्रक व कार मधील मिळून 10 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष प्रकाश दाणवे, गणेश बापु भोसले (25, रा. जवखेड खालसा, ता. पाथर्डी), प्रशांत सुरेश मिरपगार (25, रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी), प्रदीप बापु डहाणे (29), भगवान संजय डहाणे (21, दोघे रा. पिंपळगाव लांडगा), संदीप केशव बाग (29, रा. लेंद्रीमाल, उडीसा), दिलीप भेसरो (30, रा. घुडाधार, उडीसा), अक्षय डहाणे (25, रा. पिंपळगाव लांडगा), प्रमोद क्षेत्रे (भिंगार), ईश्वर संतोष गायकवाड (26, रा. पिंपळगाव लांडगा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.





