Wednesday, June 17, 2026
HomeनगरShirdi : भारत लवकरच बनणार जगातील सर्वात मोठा संरक्षण निर्यातदार देश -...

Shirdi : भारत लवकरच बनणार जगातील सर्वात मोठा संरक्षण निर्यातदार देश – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अहिल्यानगर बनणार देशातील संरक्षण उत्पादनाचे नवे केंद्र - मुख्यमंत्री फडणवीस

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भारत आता शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश राहिलेला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश म्हणून उदयास येईल, असा ठाम विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Union Defense Minister Rajnath Singh) यांनी व्यक्त केला. शिर्डी एमआयडीसी (Shirdi MIDC) येथे निबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या भव्य लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

- Advertisement -

या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, निबे समूहाचे अध्यक्ष गणेश निबे, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, अनुप सिंघल, डीआरडीओचे सेक्रेटरी डॉ. समीर कामत, केंद्रीय सचिव संजीव कुमार, ब्रह्मविहारीजी महाराज, आ. राणा जगजितसिंह, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. आशुतोष काळे, आ. अक्षय कर्डिले आ. अमोल खताळ आ. विठ्ठलराव लघे यांच्यासह संरक्षण आणि उद्योग विभागाचे अधिकारी आणि प्रकल्पाचे प्रवर्तक गणेश निबे उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाने संरक्षण उत्पादन क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन, परवाना प्रक्रियेचे सुलभीकरण आणि स्वदेशीकरणाला चालना देणारे निर्णय घेतल्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील खाजगी उद्योगांचा वाटा आता 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून भारतीय उद्योग कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर संरक्षण उत्पादनाची मजबूत परिसंस्था विकसित होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात नवोपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला राज्य शासनाकडून मोठे सहकार्य मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. भारत आता शस्त्रास्त्रांची आयात करणारा नव्हे, तर निर्यात करणारा देश बनत आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर हे संरक्षण उत्पादनाचे नवे आणि महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. राज्यात नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथे चार संरक्षण उद्योग समूह विकसित करण्यात येत असून संरक्षण उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी येथील नव्या प्रकल्पामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून चार हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणेश निबे यांनी उभारलेले संरक्षण उत्पादन केंद्र देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून 70 किलोमीटर ते 700 किलोमीटरपर्यंत अचूक मारा करणारी आधुनिक क्षेपणास्त्रे तयार केली जात आहेत. देशास कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक दारूगोळा पुरविण्याची क्षमता या केंद्रात विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये अर्धा किलोमीटर लांबीचे 9 विभाग उभारण्यात आले असून मार्गदर्शित अस्त्रे, मानवरहित विमाने आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती येथे केली जाणार आहे. या केंद्रातून तयार होणारी उत्पादने शंभर टक्के निर्यातक्षम असल्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. भारत हा शांततेचा पुरस्कार करणारा देश असला तरी देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते प्रत्युत्तर देण्यास समर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या नव्या प्रकल्पामुळे परिसरात सुमारे 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 4 हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून 70 किमी ते 700 किमीपर्यंत अचूक मारा करणारी आधुनिक क्षेपणास्त्रे तयार केली जात आहेत. या केंद्रातून तयार होणारी उत्पादने शंभर टक्के निर्यातक्षम दर्जाची असल्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढेल. प्रारंभी, निबे समूहाचे अध्यक्ष गणेश निबे यांनी प्रास्ताविकात देशाच्या सुरक्षेसाठी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सैन्यदलांना आवश्यक दारूगोळा व संरक्षण साहित्य वेळेत पुरविण्याची ग्वाही दिली. शेवटी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून निबे लिमिटेड आणि जगातील नामवंत आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. ब्लॅकस्काय : ऑप्टिकल सॅटेलाईट सुविधांसाठी भागीदारी. हॅविलँड : सी-प्लेन (समुद्री विमान) निर्मितीसाठी आशयपत्रावर स्वाक्षरी. एल्बिट सिस्टीम्स : संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी महत्त्वाचे करार.

स्वतःची शस्त्रे स्वतः निर्माण करणारा देशच स्वतःचे सुरक्षित भविष्य घडवू शकतो.
राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री

फडणवीसांचा वंदे भारतने प्रवास
या कार्यक्रमासाठी येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही खासगी चॉपर, विमान किंवा गाड्यांचा मोठा ताफा न वापरता मुंबई ते शिर्डी असा प्रवास ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने केला. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...