बीड । Beed
बीडमध्ये काल शनिवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कथित Whats App चॅट व्हायरल झाले आहेत. हे चॅट खोटे असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडिया प्लॅफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, आता या पोस्टवरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाकल केला आहे.
आमदार आव्हाड यांचे फोटो असलेले चॅट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. जितेंद्र आव्हाड हे समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला होता. याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन रुपाली ठोंबरे, विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ अघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझी खोटी Whats App व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मी काल बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?, असं जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत म्हटले आहे. व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहीती मी ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ‘ चौकशी सुरू आहे’, हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.