लासलगाव | वार्ताहर Lasalgon
लासलगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी आता दुचाकीच्या डिक्कीलाही लक्ष्य केले आहे. लासलगाव स्थानक रस्त्यावरील महावीर मॉल येथे खरेदीसाठी गेलेल्या अनिल काशिनाथ जगताप (रा. शुभश्री अपार्टमेंट, टाकळी विंचूर, शासकीय विश्रामगृहाशेजारी) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सकाळी ११.३० वाजेदरम्यान घडली.
जगताप हे महावीर मॉल येथे खरेदीसाठी गेले असताना त्यांनी आपली दुचाकी बाहेर उभी केली. संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. खरेदी आटोपून परत आल्यानंतर डिक्कीतील पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरदिवसा आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त होत आहे.
लासलगाव शहरासह परिसरात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठ, व्यावसायिक ठिकाणे आणि वाहनांच्या पार्किंग परिसरात चोरट्यांचा वावर वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. भरदिवसा घडणार्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




