Wednesday, July 22, 2026
HomeनगरAhilyanagar : जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचार्‍यांची माहिती सादर

Ahilyanagar : जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचार्‍यांची माहिती सादर

जिल्हा परिषदेचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्र

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जनगणननेच्या कामासाठी तालुका पातळीवर नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांची माहिती तात्काळ जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावीत, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीच्या सर्व गटविकास अधिकारी यांना काढले आहेत. दरम्यान, जनगणननेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना यंदा बदलीच्या प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे. यामुळे आपली जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती व्हावी, यासाठी तालुका पातळीवर ग्रामविकास विभागाच्या कर्मचार्‍यांनी महसूलच्या अधिकार्‍यांकडे फिल्डींग लावली असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या आदेशानूसार जिल्ह्यात मे महिन्यांत जनगणनेच्या कामाला सुरूवात होणार आहे. यासाठी सध्या वेगवेगळ्या तालुक्यात जिल्हा परिषद, महसूल यासह अन्य शासकीय विभागातून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दरम्यान, मागील महिन्यांत केंद्र सरकारने जनगणनेच्या कामात नियुक्ती होणार्‍या कर्मचार्‍यांना यंदाच्या बदली प्रक्रियेतून वगळण्याची सुचना राज्य सरकारला केली होती. त्यानूसार राज्य सरकारच्यावतीने याबाबत जिल्हा परिषदेला आदेश काढण्यात आले असून यात ग्रामविकास विभागात कार्यरत ‘क’ व ‘ड’ वर्गातील ज्या कर्मचार्‍यांची जनगणनेच्या कामासाठी निवड होईल त्यांची पुढील 31 मे 2027 पर्यंत बदली होणार नाही.

सरकारच्यावतीने जनगणनेच्या कामात नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना बदलीतून सवलत मिळणार असल्याने अनेक तालुक्यात सध्या जनगणनेच्या कामात नियुक्ती आदेश मिळावेत, यासाठी ग्रामविकास विभागाच्या कर्मचार्‍यांची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद पातळीवर कोणत्या पंचायत समितीतंर्गत कोण कोणत्या विभागातून तहसीलदार यांनी किती कर्मचार्‍यांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती आदेश दिले आहेत. याचा कोणताच डेटा उपलब्ध नाही. यामुळे पुढील महिन्यांत होणार्‍या बदलीच्या प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने सर्व गटविकास अधिकारी यांना पत्र काढत जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचार्‍यांची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करण्याचे आदेश काढले आहेत.

सर्वच कर्मचार्‍यांना ब्रेक ?
दरम्यान, सध्या राज्य पातळीवरून जिल्हा परिषद, ग्रामविकास विभागात कार्यरत सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना बदल्यांना स्थगिती मिळावी, यासाठी कर्मचारी संघटना मुंबईमध्ये सक्रिय असल्याचे दिसत आहे. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात स्पष्ट आदेश निघणार असून यंदा जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील कर्मचार्‍यांना बदलीतून वगळण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : आषाढ सरींचे तांडव सुरू; भंडारदरा ‘एवढे’ टक्के भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात काल मंगळवारी दुपारपासून आषाढसरींनी तांडव नृत्य करण्यास सुरूवात केल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण...