मुंबई / प्रतिनिधी Mumbai
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी राज्य सरकारकडून दुष्काळाची प्राथमिक माहिती घेतली. यावेळी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना लावलेले निकष, पीकस्थिती, पाणीसाठा, चारा, पिकांचे पंचनामे आणि हवामाननिहाय विभागातील स्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी राज्यातील सद्य:स्थितीची माहिती पथकासमोर सादर केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मदतीसाठी ५ हजार ३०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
केंद्रीय कृषी विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची तीन पथके महाराष्ट्रात आली आहेत. या पथकातील सांख्यिकी विभागाचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, निती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. साक्षी भदोरिया यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील कृषी, मदत आणि पुनर्वसन, पाणीपुरवठा, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन, सहकार, वित्त आणि नियोजन आदी विभागांसह अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यासाठी कोणते निकष लावले. दुष्काळ जाहीर करताना केंद्र सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार कार्यवाही केली आहे का याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या आठ कृषी विभागातील २६५ तालुक्यांत ३२ हजार ९२७ गावांपैकी २६ हजार १३१ गावांतील पिकांचे पंचनामे केले आहेत. सध्या दुष्काळी तालुक्यांचे ६० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागांत वेगाने पंचनामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
केंद्रीय पथकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या पथकापैकी एक पथक पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर पुणे जिल्ह्यात तर दुसरे पथक मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना भेट देणार आहे. तिसरे पथक विदर्भातील नागपूर, यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. पाहणीनंतर येत्या रविवारी किंवा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पथकांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




