Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिकच; तापमानात २ ते ७ अंशांची वाढ

यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिकच; तापमानात २ ते ७ अंशांची वाढ



नाशिक | प्रतिनिधी


राज्यात यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक तीव्रतेने जाणवत असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाने सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांची वाढ नोंदवली आहे. राज्यातील बहुतांश भागांत दुपारच्या उन्हाची तीव्रता वाढली असून, मुंबई आणि रत्नागिरी येथे उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवली. मान्सूनचे महाराष्ट्रातून ८ ऑक्टोबरला निर्गमन झाल्याने आता कोरड्या हवामानाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० ऑक्टोबरपासून कमाल तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -


दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कमाल तापमान साधारणतः ३२ ते ३४ अंश सेल्सिअस असते. मात्र, यंदा अनेक भागांतील तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहे. खान्देश, पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.


विदर्भात पारा ३९ अंशांवर
राज्यातील विभागनिहाय तापमानाचा विचार करता, मुंबईसह संपूर्ण कोकणात कमाल तापमान ३३ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांची वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील खान्देशासह नाशिक ते सोलापूरदरम्यानच्या दहा जिल्ह्यांत तापमान ३४ ते ३८ अंशांदरम्यान असून, सरासरीपेक्षा २ ते ४.५ अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३६.६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. येथेही सरासरीपेक्षा २ ते ४.५ अंशांची वाढ जाणवत आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांत तापमान ३५ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचले असून, सरासरीच्या तुलनेत २ ते ६.२ अंशांची वाढ झाली आहे.


रात्रीच्या उकाड्यातही वाढ होण्याची शक्यता
दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली असली, तरी सध्या पहाटेच्या किमान तापमानात फारशी वाढ झालेली नाही. राज्यात अलिबाग येथे २७.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, ते सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. अलिबाग वगळता राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या उकाड्याची तीव्रता तुलनेने कमी आहे. मात्र, १६ ते २२ ऑक्टोबरदरम्यान रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.


उच्च हवेचा दाब, कोरडे वारे आणि निरभ्र आकाश कारणीभूत

यंदा ऑक्टोबर हीटची तीव्रता वाढण्यामागे अनेक हवामानविषयक घटक कारणीभूत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणे, उत्तर गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत तयार झालेली उच्च हवेच्या दाबाची पट्टी, उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे येणारे उष्ण व कोरडे वारे आणि निरभ्र आकाश यांचा त्यात समावेश आहे.
राज्यात सध्या हवेचा दाब १०१२ ते १०१४ हेक्टोपास्कलपर्यंत असून, तो सरासरी १००८ ते १०१० हेक्टोपास्कलपेक्षा अधिक आहे. उत्तर भारतातून वायव्य दिशेने ताशी २० ते २५ किलोमीटर वेगाने येणारे उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहावर परिणाम होत आहे. त्यातच निरभ्र आकाशामुळे दिवसभर सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत असल्याने तापमानात वाढ होत आहे.


मुंबईत उष्णतेची तीव्रता अधिक का?

मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे साधारणतः काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र, हवेचा दाब दीर्घकाळ अधिक राहिल्यास समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुपारनंतर जाणवणारा थंडावा कमी होतो आणि सकाळचा आल्हाददायकपणाही टिकून राहत नाही.
मान्सूनच्या माघारीनंतर आकाश निरभ्र राहणे, जमिनीवर वाढणारी उष्णता आणि समुद्राकडून येणारे थंड वारे उशिरा पोहोचणे, या घटकांमुळे मुंबईत ऑक्टोबर महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढते. यंदा कमाल तापमानासोबत किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याची स्थिती असल्याने ऑक्टोबर हीटचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता कमी
पुढील दोन आठवड्यांत भारतीय समुद्रक्षेत्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची किंवा महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील कोरड्या हवामानाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, २० ऑक्टोबरपासून कमाल तापमानात घट होऊन उष्णतेच्या तीव्रतेत काहीसा दिलासा मिळू शकतो.

ताज्या बातम्या

पोलिसांना खबर्‍या देतो का? असे म्हणून एकाला कोयता, कुर्‍हाडीने मारहाण करुन...

0
नेवासा |वार्ताहर| Newasa तू पोलिसांना आमच्या खबर्‍या देतो का? असे म्हणून शनिवारी पहाटे झोपेत असलेल्या तरुणाला 10 जणांनी मारहाण करुन त्याच्यावर बंदुकीची गोळी झाडल्याची घटना...