संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात सोनसाखळी चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 2 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विवाहस्थळी सप्ताह ध्वजारोहण कार्यक्रम दरम्यान फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सुमारे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पथक करत असताना, व्यावसायिक कौशल्याच्या आधारे हा गुन्हा श्रीरामपूर येथील सराईत आरोपी सागर सुरेश कांबळे याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तसेच आरोपी चोरीच्या सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सागर सुरेश कांबळे (वय 32, रा. रामनगर वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर) व बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय 36, रा. वॉर्ड नं. 2, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपींनी आतिक अयुब उर्फ आरिफ शेख आणि सनी विलास ढोकणे (दोघेही रा. श्रीरामपूर) यांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान, हे दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सदर आरोपींकडून 1 लाख 49 हजार 500 रुपये किमतीचे 11.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि 70 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 2 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.





