Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमदर्शनाहून येणार्‍या महिलेच्या गळ्यातील गंठण तोडून पोबारा

दर्शनाहून येणार्‍या महिलेच्या गळ्यातील गंठण तोडून पोबारा

गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत घबराट

बेलापूर |वार्ताहर| Belapur

श्री केशव गोविंद बनातून देवदर्शन करुन पायी परत येत असताना, मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा भामट्यांनी प्रवरा नदी पुलावर एका महिलेचे दोन तोळ्यांचे गंठण ओरबाडून पोबारा केला. काल सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. या संदर्भात बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रावणी सोमवार निमित्त बेलापूर परिसरातील मोठ्या संख्येने भाविक श्री हरिहर केशव गोविंदांच्या दर्शनासाठी बेलापूर, बन व उक्कलगाव येथे जात असतात. काल दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे गावातील अनेक भक्तगण बनात सकाळीच दर्शनासाठी गेले होते.दोन महिला दर्शन करुन घरी परतत असताना प्रवरा नदीवरील पुलावर पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण तोडून श्रीरामपूरच्या दिशेने धूम ठोकली.
यावेळी बेलापूरचे माजी सरपंच भरत साळूंके हे ही सपत्नीक देवदर्शन करुन परत येत असताना, त्यांना ही घटना समजली. त्यांनी लगेच चोरांचा पाठलाग केला. परंतु चोरटे पसार झाले. त्यांनी तातडीने बेलापूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली, बेलापूरचे पोलीस हवालदार गणेश भिंगारदे, संपत बडे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पल्सर मोटारसायकलवर दोन इसम चेहरा झाकलेल्या अवस्थेत जाताना दिसत आहे.

बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार गणेश भिंगारदे यांनी तातडीने पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना सूचना दिली. बडे हे तात्काळ श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवर येणार्‍याचा शोध घेत होते. त्यांना तोंड बांधलेले दोन इसम मोटरसायकलवर जोरात जाताना दिसले. त्यांनी त्यांना सरळ मोटरसायकल आडवी घातली. मोटारसायकल आडवी घातल्यामुळे संपत बडे मोटरसायकलसह खाली पडले. त्यांना किरकोळ दुखापत झाली. चौकशी केल्यानंतर ते अन्य प्रवासी असल्याचे लक्षात आले. या घटनेबाबत बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहर पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीस तपास करत आहेत. सध्या श्रावण महिना चालू असून अनेक महिला सोन्याचे मौल्यवान दागिने घालून देवदर्शनाकरता जात असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या दागिन्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, असे आवाहन बेलापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

गुन्हेगारांचे पोलिसांना पुन्हा आव्हान
गेले काही महिने शांत झालेल्या गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढुन आपल्या करामती दाखविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. जनतेत पुन्हा असुरक्षितता आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी बेकायदा कृत्ये करुन गुन्हेगार एकप्रकारे पोलिसांना पुन्हा आव्हान तर देत नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. या घटनेचा पोलिसांनी छडा लाऊन गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...