शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी शहरातील दत्तनगर येथे भाडोत्री खोली घेऊन राहणार्या झारखंड येथील चार तरुणांचे खोलीतून सिल्व्हर फॉईल पेपरमध्ये गुंडाळलेले आयफोन सह विविध नामांकित कंपन्यांचे सुमारे 18 लाख 34 हजार रुपये किमतीचे चोरीचे 55 मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले. सिमकार्ड सह वेदनाशामक औषधी गोळ्याही येथे पोलिसांना मिळून आल्या आहेत. पोलिसांनी या खोलीत धाड टाकताच दोन जण मागच्या दरवाजाने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस रात्रीची पेट्रोलिंग करत असताना शहरातील दत्तनगरमध्ये एका खोलीत भाडोत्री राहत असलेल्या झारखंड येथील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान एका चोरीच्या मोबाईलचे लोकेशन पोलीस ट्रॅक करत होते. पोलिसांना संबंधित लोकेशन त्याच ठिकाणी ट्रेस होत होते. पोलीस त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी खोलीकडे गेले असता घराचे मागील बाजूस असलेल्या दरवाजामधून अंधाराचा फायदा घेत व स्वतःचे अस्तित्व लपवण्याच्या उद्देशाने दोन तरुण पळून गेले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सापडले नाही.
पोलिसांनी खोलीतील एका बॅगेची पाहणी केली असता घरातील त्या बॅगमध्ये सुमारे 18 लाख 34 हजार रुपये किंमतीचे विविध नामांकित कंपनीचे एकूण 55 मोबाईल मिळून आले. तसेच सिमकार्ड व वेदनाशामक गोळ्या आढळल्या. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून मोबाईल्स बॅग व इतर साहित्य ताब्यात घेऊन आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 861/ 2026 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122, 124 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व त्यांचे सहकारी करत आहेत.
बॅग भरून आढळलेल्या या चोरीच्या मोबाईलमध्ये बहुतांशी मोबाईल हे नाशिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. यामध्ये अॅप्पल, ओप्पो, विवो, सॅमसंग, रेडमी यासह विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल आहेत. चोरीच्या अॅप्पल अथवा इतर मोबाईलचे लोकेशन पोलिसांना अथवा इतरांना ट्रॅक होऊ नये म्हणून चोरट्यांनी संबंधित मोबाईलला रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ पॅकिंग करता वापरला जाणारा फॉईल अर्थात सिल्वर पेपर मध्ये हे मोबाईल पॅक गुंडाळून बॅगेत ठेवलेले होते.




