पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
शहरातील आनंदनगर परिसरात शनिवारी (दि. 11) सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. या प्रकारात हिसका बसल्याने संबंधित महिला रस्त्यावर पडल्या. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संगीता सुधाकर पाखरे (वय 53) या मैत्रीण अर्चना खेडकर यांच्यासह अर्जुन बाबा मंदिराजवळून आनंदनगरकडे पायी जात असताना स्पोर्ट्स दुचाकीवरील तिघा अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला.
संधी साधून एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावले. अर्चना खेडकर यांनी आरडाओरडा केला; मात्र आरोपी भरधाव वेगाने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये संशयित आरोपी कैद झाले आहेत. फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. संगीता पाखरे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पाथर्डी शहरात धूमस्टाईलने सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये व्यापार्याच्या दुकानातून साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावण्यात आली होती. त्यानंतर साईनाथनगर परिसरात दोन महिलांना लक्ष्य करण्यात आले. आता आनंदनगरातील ताज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बहुतांश गुन्ह्यांचा अद्याप उलगडा न झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.




