Monday, July 6, 2026
Homeमहाराष्ट्रAccident News : महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचे...

Accident News : महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचे वाहन उलटले; एका तरुणाचा मृत्यू, १७ जखमी

चंद्रपूर । Chandrapur

महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन उत्साहात परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ भाविकांचे वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात एका १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य १७ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १२ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. भूषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) असे या अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पाटाळा परिसरातील शिवभक्त महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका मालवाहू वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. भटाळा येथे महादेवाचे दर्शन झाल्यानंतर हे सर्व भाविक पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठाकडे दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वाटेत पाटाळा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वाहन रस्त्यावरच उलटले. वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात अत्यंत भीषण होता, ज्यात भूषण दोडके याला आपला जीव गमवावा लागला.

अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू केले. या अपघातात एकूण १७ जण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी १२ जणांना गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ५ जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत.

या अपघातातील गंभीर जखमींमध्ये मयूर वनशिंगे (१६), राजू किसन शिवरकर (४२), राजू जाधव (४०), मंथन डाहूले (१३), लकी भडके (२०), नानाजी मरस्कोल्हे (७०), गणेश खापणे (४०), मारोती शिवरकर (४५), विनोद गौरकर (५०), रोशन माडवे (१७), मारोती बदखल (५०) आणि सोहम भोयर (१६) यांचा समावेश आहे. तसेच प्रवीण आवारी, गुरुवेश जाधव, ओंकार मांढरे, प्रतीक पारखी आणि रोहित झाडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच माजरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे. महाशिवरात्रीच्या आनंदाच्या वातावरणात अशा प्रकारे एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याने पाटाळा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...