
मुंबई । Mumbai
शासकीय वसतिगृहातील वयोमर्यादेची अट रद्द करणे, रिक्त पदांची तातडीने भरती आणि इतर मूलभूत सुविधांसाठी पुणे, नाशिक व नागपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण व आंदोलन पेटले आहे. मात्र, या संवेदनशील विषयावरून सुरू झालेल्या राजकीय चिखलफेकीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला आहे. “आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून राहुल गांधींचे महाराष्ट्रात ‘रिलाँचिंग’ करण्याचा काँग्रेसचा डाव आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने अतिशय गांभीर्याने आणि सकारात्मकतेने पावले उचलली असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, “शासनाने विद्यार्थ्यांशी आधीच तीन वेळा सविस्तर चर्चा केली आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून तसे लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांचे ऐकून घेण्यासाठी केवळ चौथ्यांदाच नाही, तर गरज पडल्यास हजार वेळा संवाद साधायला तयार आहे. जर प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत, तर मग हे आंदोलन पेटवत ठेवण्याचा हट्ट कोणासाठी केला जातोय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसवर थेट निशाणा साधताना बावनकुळे पुढे म्हणाले की, काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या करिअरपेक्षा आपल्या नेत्यांचे राजकीय भविष्य वाचवण्याची अधिक चिंता आहे. राहुल गांधी यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मुद्दाम चिघळवले जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले राजकीय स्वार्थ साधण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील जनता आणि आदिवासी समाज हा राजकीय गेमप्लाॅन कधीही स्वीकारणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी आणि सुविधा वाढवण्यासाठी अत्यंत संवेदनशीलतेने काम करत आहे. त्यामुळे काँग्रेसने विद्यार्थ्यांना राजकीय ढाल न बनवता, खरोखरच आस्था असेल तर संवादाचा मार्ग स्वीकारावा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे काँग्रेसने तातडीने थांबवावे, असा कडक इशाराही त्यांनी या वेळी दिला.




