नाशिक | Nashik
“जिसके लिये तुम अपनी जान देना चाहते हो, वो कहाँ है तुम्हारा स्वराज…?”
वधस्तंभावर बांधलेल्या, रक्ताने न्हाऊन निघालेल्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब कुत्सित पणे हा प्रश्न विचारतो आणि तशाही अवस्थेत बाणेदारपणे महाराज उत्तर देतात,
“सह्याद्री के पहाडोंमें, गोदावरी की लहरों में, रायगड की मिट्टी मे, जालनाकी गलियोंमे,
नाशिक की हवावोमे, कोंकणके कोनोमे, जय भवानी के चरणो मे, लाखो मराठावोके नसानस मे
है स्वराज….”
छावा या चित्रपटातील एका दृश्यातील हे संभाजी महाराजांच्या मनातील स्वराज्य आणि त्या स्वराज्यातील नाशिक आणि गोदावरीचे उल्लेख आहेत.
मात्र त्याही पलीकडे छावा या चित्रपटाशी अजून काही नाशिककर प्रत्यक्ष–अप्रत्यक्ष जोडले गेले आहेत.
१४ फेब्रुवारी २०२५ ला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शीत आणि विकी कौशल अभिनित छावा हा हिंदी चित्रपट रिलीज झाला आणि अवघ्या तीन दिवसात चित्रपटाने १५० करोडचा टप्पा ओलांडत अनेक विक्रम प्रस्थापित केले.
खरंतर छावा चा ट्रेलर आला तेव्हाच चित्रपट चांगला असेल असे वाटले. पण ट्रेलर बघून लगेच लेझिम नृत्य आणि हिंदवी स्वराज्य ऐवजी फक्त स्वराज्य या शब्दाचा वापर शिवप्रेमी चाहत्यांना खटकला आणि वाद वाढला.
आधी पुष्पा–२ सोबत छावा रिलीज न करण्याचा शहाणपणाचा निर्णय छावा च्या निर्मात्याने घेतला आणि तो खूप फायद्याचा ठरला. आज ५व्या–६व्या दिवशी सुद्धा चित्रपटाची तिकीट मिळत नाहीयेत. २४ तास शो सुरू आहे तरीही सकाळी ६.० चा शो सुद्धा हाऊसफुल्ल चालला आहे. तामिळनाडूत स्त्रियांना चित्रपट मोफत दाखवला जातोय, तर तेलंगणा मध्ये शाळा विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवत आहेत.
सगळीकडे चर्चा फक्त छावा, विकी कौशल, रश्मिका , अक्षय खन्ना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचीच होते आहे. शेवटच्या ३० मिनिटात तर छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अघोरी अत्याचार बघून प्रेक्षक सुन्न होऊन जातात. ओक्साबोक्शी रडत प्रेक्षागृहातून बाहेर पडत चित्रपटांबद्दल भरभरून बोलत आहेत. हे असं प्रेक्षकांचे भरभरून प्रेम. आणि प्रचंड मोठ्ठ आर्थिक यश गेल्या कितीतरी वर्षात काही मोजक्याच चित्रपटांच्या वाट्याला आले आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाप्रती तीव्र असलेली अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरची अढळ श्रद्धा या चित्रपटाच्या रूपाने उफाळून आली आहे. प्रेक्षक भावनिक होत आहेत, ओक्साबोक्शी रडत थिएटर च्या बाहेर पडत आहेत. विशेषतः विद्यार्थी आणि लहान मूल जास्त भावनिक होत आहेत. त्यांना आपला हा गौरवशाली इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवायलाच हवा अशी चर्चा होतेय आणि कृतीत येते आहे.
मात्र या चित्रपटाला, याच उद्देशाने UA प्रमाणपत्र मिळायलाच हवे, तरुण मुलांना हा चित्रपट बघता यावा आणि दाखवायलाच हवा असा ठामपणे आग्रह धरणारा माणूस, सेन्सॉर बोर्डाचा सदस्य नाशिककर आहे हे तुम्हाला माहिती आहे का …?
लेखक दिग्दर्शक असलेले आर्कि. विजय बाळासाहेब पवार हे नाशिककर आहेत आणि केंद्रीय चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे ते सदस्य आहेत. कितीतरी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या आणि ३० देशांमध्ये दाखवल्या गेलेल्या ” अँम आय ऑडिबल…?” या लघुपटाचे लेखक दिग्दर्शक, मानाचा झी गौरव पुरस्कार विजेते नेपथ्यकार आणि मराठा मंदिराचा प्रथम पुरस्कार विजेते लडाख डायरी, ऑपरेशन गंगा, अमरनाथ–बोलावणं आल्याशिवाय नाही, मी मनस्वी या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
गेली दोन वर्ष आर्कि. विजय पवार हे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (CBFC) म्हणजेच सेन्सॉर बोर्डाचा सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आजवर भोजपुरी, गुजराथी, तमिळ, तेलगू, इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषेतील २५ पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी सेन्सॉर केले. त्यांच्यात योग्य त्या दुरुस्त्या सुचवल्या, करून घेतल्या आणि ते चित्रपट प्रमाणित केले.
पवारांनी सांगितले की, ” तुमच्यातला एक नाशिककर, आर्किटेक्ट म्हणून सांगायला अतिशय अभिमान वाटतो की, मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला आणि ब्लॉक ब्लास्टर/ मेगा हिट ठरलेला “छावा” हा चित्रपट सेन्सॉर करण्याची जबाबदारी अनपेक्षितपणे माझ्यावर आली. आधीच चित्रपटाबद्दल खूप वाद झाल्याने, ती जबाबदारी तितक्याच जबाबदारीने पार पाडत काही वादग्रस्त दृश्यांवर आणि संवादावर ठामपणे आम्ही कात्री चालवली. छत्रपती संभाजी महाराजांची कुठेही विटंबना होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत, मराठ्यांचा इतिहास आणि अस्मिता यात कुठलीही तडजोड करता येणार नाही असे एकीकडे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना सांगून, हा चित्रपट तरुण पिढीला बघता यावा म्हणून चित्रपटाला UA16+ प्रमाणपत्र देण्याचा मी आग्रह धरला. “
महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर स्वतः ही महाराष्ट्रीयन आहेत. त्यामुळे त्यांनी आमची भावना आणि उद्देश समजून घेऊन सामंजस्याची भूमिका घेत सेन्सॉरच्या सूचना, दुरुस्त्या विनातक्रार स्वीकारल्या.
” असा हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदान जगभर पोहोचवणारा भव्य चित्रपट बनवण्याच शिवधनुष्य ताकतीने पेलल्याबद्दल उतेकरांचे आम्ही अभिनंदन सुद्धा केले. ” असेही आर्कि. विजय पवारांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा