नाशिक | Nashik
नुकतेच भाजपचे (BJP) दोन दिवसीय अधिवेशन देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत शिर्डीत पार पडले होते. या अधिवेशनातून (Convention) भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचा कानमंत्र दिला होता. त्यानंतर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत दोन दिवसांचे अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार शिर्डीत हजर झाले आहेत. या अधिवेशनातूनच राष्ट्रवादीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे या अधिवेशनासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) उपस्थित राहणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. भुजबळ हे आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले होते, त्यांनी ही नाराजी वेळोवेळी माध्यमांद्वारे बोलून देखील दाखवली होती. याशिवाय पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भुजबळ आणि राष्ट्रवादीतील (NCP) नेत्यांमध्ये अबोला असल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र, अखेर आज भुजबळ यांनी शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. पंरतु, ते पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर अजूनही नाराज असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) काल येऊन बसले होते,सुनील तटकरे यांनी सुद्धा अधिवेशनाला या अशी विनंती केली होती. त्यामुळे मी अधिवेशनासाठी आलो आहे, थोडा वेळ थांबून जाणार आहे. मात्र,याचा अर्थ सर्व काही स्वच्छ झाले असे होत नाही असे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी त्यांना नाराजीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नाराजी दूर झाली हा मुद्दा येत नाही,हे पक्षाचे शिबीर असून कुठल्याही व्यक्तीचे शिबीर नाही,असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
अजित पवार आणि भुजबळांमध्ये अबोला
यावेळी छगन भुजबळ यांना माध्यम प्रतिनिधींनी ‘अजित पवारांनी (Ajit Pawar) तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी फोन केला होता का’, प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, मला याबाबत अजित पवारांनी कुठलाही फोन केलेला नव्हता. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना पुन्हा हाच प्रश्न विचारल्यावर भुजबळ भडकल्याचे दिसून आले. तसेच या प्रश्नावर भुजबळ यांनी “जाऊ द्या, एकदा नाही म्हणून सांगितलं ना” असे म्हटले. त्यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये अजूनही अबोला असल्याचे दिसून आले.