अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यापूर्वी करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका युवतीला बोलावून घेऊन, तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तरूणाविरूध्द रविवारी (28 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक विश्वनाथ जावळे (रा. रानमळा मंठा, जि. जालना, हल्ली रा. सावेडी नाका, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील पीडित 23 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. सदरची घटना शनिवारी (27 जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास सावेडी नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती खासगी नोकरी करते. संशयित आरोपी दीपक जावळे याने फिर्यादीला सावेडी नाका भागातील एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या अपार्टमेंटमध्ये बोलावून घेतले होते. तू माझ्याविरूध्द केलेली जुनी तक्रार मागे घे, मी तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष त्याने फिर्यादीला दिले. त्यानंतर त्याने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या प्रकाराला पीडिताने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित आरोपीने तिला मारहाण केली. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित युवतीने तोफखाना पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दीपक जावळे याच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकसिंगे करीत आहेत.




