पुणे : वृत्तसंस्था Pune
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२२ ऑगस्ट) पुण्यात ‘छात्रों की गुंज’ या विशेष कार्यक्रमातून विद्यार्थिनींशी संवाद साधला. एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षण, महिला सुरक्षा, रोजगार, स्पर्धा परीक्षा, समानता आणि महिलांच्या स्वातंत्र्यासह विविध विषयांवर चर्चा झाली. पुण्यातील हा कार्यक्रम विशेषतः विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता.
राहुल गांधी यांनी आपल्या संबोधनात महिलांच्या स्वायत्ततेचा मुद्दा ठळकपणे मांडला. भारतातील सुमारे ७० कोटी महिला देशाची मोठी ताकद असून, देशाच्या भवितव्याच्या निर्मितीत त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असावा आणि समाजातील जुन्या रूढी व बंधनांना प्रश्न विचारण्याची गरज असल्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी मनुस्मृतीतील महिलांबाबतच्या विचारांचा उल्लेख करत त्यातील चुकीच्या व्याख्यांना आव्हान देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिलांच्या समान हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर संवाद
‘छात्रों की गूंज’ मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः तरुणींच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पुण्यातील कार्यक्रमासाठी शिक्षण व्यवस्था, परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटी, महिलांची सुरक्षितता, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि करिअरशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले होते.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून मोठे राजकीय महत्त्व देण्यात आले होते. यापूर्वी कोटा, डेहराडून आणि प्रयागराज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ‘छात्रों की गूंज’ मोहिमेचा पुढील टप्पा पुण्यात घेण्यात आला. पुण्यातील कार्यक्रम केवळ विद्यार्थिनींसाठी ठेवण्यात आल्याने महिला आणि युवकांशी संवाद साधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना यामुळे वेगळे स्वरूप मिळाले.
आश्रमशाळेतील मुलींच्या प्रश्नावर उपोषणाला बसण्याचा इशारा
मांजरीत राहणाऱ्या आदिवासी समाजातील मुलीने आपले प्रश्न मांडत विविध मागण्यांसाठी आपले कुटुंबीय उपोषण करत असल्याचे राहुल गांधी यांना सांगितले. मात्र, आदिवासी विकासमंत्र्यांना आदिवासी विद्यार्थिनींचे प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नाही. वसतिगृहाची अट 13 वर्षांपर्यंतची असून, ती वाढवली जावी तसेच सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींना 1 कोटीची मदत मिळावी, अशा मागण्या या विद्यार्थिनीने केल्या. त्यावर आपण मिळून दबाव बनवू, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि महिला प्रश्न पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्था, महिला सुरक्षा आणि समानतेसारख्या मुद्द्यांवर तरुणाईशी थेट संवाद साधण्याचा राहुल गांधींचा हा प्रयत्न आगामी काळातील युवक-केंद्रित राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
कार्यक्रमापूर्वी ABVP-NSUI आमनेसामने
दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात ABVP आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि झटापट झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही संघटनांकडून या घटनेबाबत परस्परविरोधी आरोप करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी देताना ३० अटी घातल्या होत्या. आक्षेपार्ह बॅनर किंवा चित्रे लावू नयेत, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, अशा सूचना आयोजकांना देण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.




