मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मतदार यादीत घोटाळा झाल्याचा आरोप करत भारत निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणारे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी पत्र पाठवले. मतदार यादीत अयोग्यरित्या समाविष्ट किंवा वगळले गेलेले नावांचे तपशील असलेली सहीयुक्त घोषणापत्र आपण सादर करावे जेणेकरून आवश्यक कारवाई करता येईल, असे चोक्कलिंगम यांनी पत्रात नमूद केले आहे.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघातील २०२४ च्या निवडणुकीतील माहितीचा दाखला देत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने “मोठा फसवणुकीचा प्रकार” केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठ पाठवण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मसुदा आणि अंतिम मतदार यादीवर काँग्रेसने कोणताही औपचारिक आक्षेप नोंदवलेला नाही, याकडे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचे लक्ष वेधले आहे.
तुमच्या विधानाबाबत मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम २० अंतर्गत हे विधान सत्य आहे, अशी घोषणा करणे आवश्यक आहे. तसेच, चुकीची माहिती देणे ही लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० च्या कलम ३१ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरते, असा इशाराही गांधी यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
महाराष्ट्रातील मतदार यादीचे मसुदे काँग्रेसच्या प्रतिनिधींना ऑगस्ट २०२४ मध्ये देण्यात आले होते. तर अंतिम मतदार यादी सप्टेंबर २०२४ मध्ये देण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने या यादीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे कोणतेही अपील दाखल केले नव्हते. निकालाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले जाऊ शकते, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना पत्राबरोबर कोरा घोषणापत्राचा नमुना पाठवला आहे. या घोषणापत्रावर स्वाक्षरी करून ते परत पाठवावे. जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल, असेही पत्रात नमूद केले आहे.





