Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पाचे ई-भूमिपूजन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळात आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. याशिवाय छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची भरणा प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचे तसेच आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.

पुढील वर्षी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत सिंहस्थ कुंभमेळा आढावा घेतला. कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत आणि भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साधू, महंतांनी जे चांगले काम होत आहे, त्याचे कौतुक केले आहे. तसेच जे काम अधिक गतीने आणि परिणामकारक व्हायला पाहिजे, त्यासाठी सूचना केल्या आहेत. साधू महंतांच्या बैठकीतील सविस्तर चर्चेने कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निश्चितच मदत होणार आहे. कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी बृहद नियोजन करण्यात आले आहे.

पुढील वर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन आणि तयारी ही केवळ याच कुंभमेळ्यासाठी नसून ती पुढील १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी असणार आहे. पुढील काळात व्यवस्थेला या कुंभमेळ्यासाठी उभारलेल्या कामातूनच पुढील व्यवस्था उभाराव्या लागतील, अशा पद्धतीने काम करण्यात येत आहे. कुंभमेळा निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात स्थायी स्वरूपात विकासकामे होतील, याचाच प्राधान्याने विचार होत आहे. कुंभमेळा हा भविष्यातही विस्तारणारा असल्याने त्या पद्धतीने व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे,असे फडणवीस म्हणाले.

त्र्यंबकेश्वर देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी नदी उगमाच्या पवित्र सानिध्यामध्ये हा कुंभमेळा होत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात कॉरिडॉरचे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा होईल. तसेच नाशिक येथील कुंड, रामकाल पथ, मंदिर, गुफा यांचाही जीर्णोध्दार करण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्म पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कुंभमेळा निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचाही बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक साधू, महंत आणि भाविकांना आरोग्य विषयक कुठलीही अडचण होणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले आदी उपस्थित होते.कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सादरीकरण केले. बैठकीच्या सुरुवातीला त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या दर्शन पथाचे ई-भूमिपूजन करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्प
एकूण खर्च: ६६५ कोटी रुपये
अखंड दर्शनासाठी एकेरी मार्ग प्रणाली
टप्पे: पहिला टप्पा २७५ कोटी; दुसरा टप्पा ३९० कोटी
९ हजार भाविकांची क्षमता असलेले ‘शिव दर्शन संकुल’, वातानुकूलित हॉल आणि एलईडी स्क्रीनची सुविधा
५ मिनिटांत आपत्कालीन निर्गमन क्षमता आणि एआय-आधारित गर्दी व्यवस्थापन
काळ्या पाषाणातील पारंपारिक मराठा शैलीतील बांधकाम शहरातील वाहतूक कोंडीत ८० टक्के घट आणि स्थानिक विक्रेत्यांचे पुनर्वसन

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...