अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
हुंड्यासाठी छळ करून संशयास्पद मृत्यू झालेल्या ज्योती मोहित साळुंके (रा. चितळी स्टेशन, ता. राहाता) या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्याची, तसेच शवविच्छेदन अहवालात तफावत दाखवणार्या वैद्यकीय अधिकार्यास सहआरोपी करण्याची, तसेच पुरावे नष्ट करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. दरम्यान, या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासोबतच दोषी पोलिसांची चौकशी करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहे.
मंगळवारी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक घार्गे यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ज्योतीचे भाऊ सचिन अनर्थे, वडील नानासाहेब अनर्थे (रा. चंद्रापूर, ता. राहाता) यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती पत्रकारांपुढे मांडली. ज्योती यांचा विवाह 2017 मध्ये मोहित साळुंके यांच्याशी झाला. सुरूवातीच्या काही महिन्यांत संसार सुरळीत होता. मात्र, नंतर सासरच्यांनी पाच लाख रूपये हुंड्याची मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. वडिलांनी अडीच लाख रूपये देऊनही छळ थांबला नाही.
अखेर, 20 जून 2021 रोजी ज्योतीचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या तीन सदस्यांविरोधात छळ व आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंदवले. मात्र, ही आत्महत्या नसून तिची अमानुष पध्दतीने हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्योतीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा सुरू ठेवू. महिला अत्याचाराच्या प्रकरणात निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.
शवविच्छेदन अहवालात तफावत
या प्रकरणात श्रीरामपूर येथील सरकारी रूग्णालयातील तात्कालीन वैद्यकीय अधिकार्यांनी शवविच्छेदन अहवालात तफावत दाखवून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला. तपास करताना पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित केले किंवा नष्ट केले, त्यामुळे संशयित आरोपी मुक्त फिरत आहेत. इतकेच नव्हे तर, मृत ज्योतीचा मुलगा शिवांश याला देखील जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर माहितीही यावेळी देण्यात आली.
एसपींचा आश्वासक प्रतिसाद
या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रकरणाचा पुनर्तपास करून 15 दिवसांत चौकशीचा अहवाल सादर केला जाईल, त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला जाईल, असे आश्वासन दिले. वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल. तसेच दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधीक्षक घार्गे यांनी पीडित कुटुंबाला दिले असल्याचे देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महिला आयोगाची अध्यक्षा पक्षनिरपेक्ष असावी : देसाई
राज्यात महिलांवर अत्याचार, हुंडाबळीच्या घटना वाढत असताना महिला आयोग निष्क्रिय असल्याची टीका तृप्ती देसाई यांनी केली. महिला आयोगाची अध्यक्षा ही कोणत्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी नसावी, तर 24 तास काम करणारी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणणारी असावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी महिला आयोगाने सुट्टी घेतल्याचे पाहून आयोगाची कार्यपध्दतीच प्रश्नात येते. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत पक्षनिरपेक्ष नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.