अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीगोंदा येथील साहिल ट्रेडर्समधून 10 लाख 5 हजार 800 रुपयांचे सिगारेटचे बॉक्स चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने काळेवाडी, पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून श्रीगोंदा व दौंड येथील गुन्ह्यांतील एकूण 11 लाख 46 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
4 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा येथील साहिल ट्रेडर्सचे कुलूप तोडून सिगारेट चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली गणेश लोंढे, सुयोग सुपेकर, राहुल द्वारके, प्रताप देवकाते, विशाल तनपुरे, अमृत आढाव व प्रशांत राठोड यांचे पथक तयार केले. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव (वय 22, रा. तायरा सोसायटी, नानेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे), गोविंद लालु रूपवते (वय 21, रा. सद्गुरूनगर, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे), पीरप्पा उर्फ सचिन जगन्नाथ येरे (वय 22, रा. सद्गुरूनगर, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे), संजय उर्फ पंकज सर्वन वर्मा (वय 20, रा. सद्गुरूनगर, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोबाईल व 15 हजार रुपये रोख, असा 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत व्यंकटेश जाधव व गोविंद रूपवते यांनी 28 सप्टेंबर रोजी दौंड येथे वाहनातील सिगारेटची पिशवी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. या चोरीतील सिगारेटही हस्तगत करण्यात आल्या. आरोपींनी चोरीच्या सिगारेट राजेश रामकरन गर्ग, महेश परमानंद भोजवाणी व संगमेश अमर लासुने, सर्व रा. पुणे, यांना विकल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पंचांसमक्ष श्रीगोंदा गुन्ह्यातील 10,05,800 रुपये व दौंड गुन्ह्यातील 1,40,900 रुपये किमतीच्या सिगारेटचे बॉक्स असा एकूण 11,46,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात रूपेश उर्फ दादया भोसले व गौरव वारे (दोघे रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) हे फरार आहेत. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.




