Wednesday, July 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! CJP च्या आंदोलनानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमधून सीआरपीएफच्या...

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमधून सीआरपीएफच्या २० तुकड्या दिल्लीत बोलवल्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आजचा ३३ वा दिवस आहे. सकाळपासूनच आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि समर्थक जमले आहे. सकाळपासून भर पावसात आंदोलक आंदोलन स्थळी उपस्थित आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी रात्री केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून कोलकात्याहून सीआरपीएफच्या २० कंपन्या दिल्लीत पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण १० एफआयआर दाखल केले आहेत. या प्रकरणात आंदोलकांनी पोलिसांवर आणि दंगल नियंत्रण पथकातील जवानांवर हल्ला करणे, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

या घटनेनंतर जंतर-मंतर आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सीआरपीएफच्या तुकड्या मोठ्या प्रमाणावर तैनात होत्या. निवडणूक झाल्यानंतरही त्या सुमारे दोन महिने तैनात ठेवण्यात येणार होत्या. यापैकी काही तुकड्या आता दिल्लीला आणण्यात येत आहेत.

चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद मार्ग पोलीस ठाण्यात चार, कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तीन, तर मंदिर मार्ग, बाराखंबा रोड आणि कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांचा तपास सुरू असून आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांशी संबंधित पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.

मंगळवारी रात्री आंदोलनात सहभागी झालेल्या काही उपद्रवी घटकांनी परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हुसकावणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या तत्त्वांवर दिल्ली पोलिसांनी ओळख पटवून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

यापूर्वीही दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी सीआरपीएफ आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या सुमारे 30 तुकड्या राजधानीत तैनात करण्यात आल्या होत्या. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता या दलांकडून संसद परिसर, संवेदनशील भाग आणि आंदोलनस्थळांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या