नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
NEET पेपरफुटीच्या गैरव्यवहारावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या महिन्यापासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. मात्र, आज या आंदोलनाने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून गेल्या महिनाभरापासून आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकांनी आज संसद मोर्चाचे आयोजन केले असून हे आंदोलन चांगलेच पेटले आहे.
आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी काल रात्रीपासून जंतरमंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजीत दिपके यांच्यासह सर्व आंदोलकांना त्याचठिकाणी अडवून ठेवले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या काही समर्थकांचा वेगळा जमाव संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाने आक्रमक स्वरुप धारण केल्यामुळे सोमवारी दुपारी पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असा दावा सौरव दास यांनी केला आहे, तसेच विरोधी पक्षांनी आता रस्त्यावर उतरावे, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहान यावेळी दास यांच्याकडून करण्यात आले आहे. आता हे आंदोलन अधिकच पेटले असून, आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
जे.पी. नड्डा यांची केवळ १० मिनिटे भेट
जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर सौरव दास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिले, “मी आणि आशुतोष रांका यांनी सुमारे २ तास वाट पाहिल्यानंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची १० मिनिटे भेट घेतली. आम्ही आमच्या मागण्यांचे पत्र त्यांना लेखी स्वरूपात दिले असून त्यांनी पुढे चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही त्याच प्रक्रियेत गुंतलो आहोत. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांना ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्याही येत आहेत.”
धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला
एकीकडे सीजेपीचे आंदोलक संसद भवनाच्या दारापर्यंत पोहोचले असताना पोलिसांकडून त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. त्याचवेळी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेल्याचे समोर आले. तरुणांच्या मोठ्या आंदोलनानंतर आतातरी ते राजीनामा देतील का? याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.




