अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शासकीय ठेकेदाराच्या संस्थेत लिपीक म्हणून काम करणार्या इसमाने संगनमत करत 1 कोटी 26 लाख 13 हजारांचा अपहार करत संस्थेची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शासकीय ठेकेदार असलेले संदीप भापकर (रा. दिल्लीगेट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीराम फुंदे, कांचन फुंदे व महेश जावळे (रा. लोहारवाडी, ता. नेवासा) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी भापकर यांच्या एस. आर. कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये फुंदे हा कामाला होता. 2018-19 पासून संस्थेच्या अकाउंटची कामे व आर्थिक व्यवहार पाहत होता.
संस्थेचे आयकर रिटर्न्स हे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भरले जातात. त्यामुळे जुलै 2024 मध्येच आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली. हे सर्व फुंदे हाच करत होता. त्यास इतर कर्मचारी मदत करत होते. या कर्मचार्यांना 2023-24 या वर्षाचा ओपन आणि क्लोजिंग बॅलन्स जुळत नव्हता, ही बाब इतर कर्मचार्यांनी फिर्यादी भापकर यांच्या निदर्शनास आणली. त्यांनी सखोल माहिती घेत बँक व्यवहार तपासले असता फुंदे याने त्याच्या बँक खात्यात 49 लाख 29 हजार 999 रुपये, तसेच त्याची पत्नी कांचन फुंदे हिच्या बँक खात्यात 14 लाख 90 हजार 483 रुपये तर त्याचा मित्र महेश जावळे याच्या खात्यात 61 लाख 92 हजार 845 रुपये असे 1 कोटी 26 लाख 13 हजार 327 रुपये एवढी रक्कम वर्ग करून संस्थेच्या पैशाचा अपहार केला.
ही बाब समोर आल्यावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केल्यावर त्याची आई, भाऊ व इतरांनी आम्ही सर्व रक्कम परत करतो, असे सांगत राहते घर, शेतजमीन विक्री करून ती परत करण्याबाबत हमीपत्र लिहून दिले. त्यानंतर पुन्हा खोटे कागदपत्रांच्या आधारे एस. आर. कन्स्ट्रक्शन या फर्मच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करत पुन्हा विश्वासघात केला. त्यामुळे भापकर यांनी अखेर 31 जानेवारीला श्रीराम फुंदे, कांचन फुंदे, महेश जावळे यांच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.