अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होऊन थंडीमध्ये घट झाली आहे. कडाक्याच्या थंडीचे प्रमाण ओसरले आहे. वातावरणातही कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने गहू, हरभरा, कांदा या पिकांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. या पिकांना थंडी ही पोषक असते व अशा वातावरण बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. शेतकर्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्याची सुरूवात झाल्यानंतर काही दिवसातच थंडी वाढू लागली होती. गेल्या आठ दिवसात अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल पाच ते सहा अंशांनी घट झाली होती व त्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला होता. 19 नोव्हेंबरला अहिल्यानगर शहराचे किमान तापमान 11.6 अंश होते त्यामुळे सर्वात कमी तापमानाची नोंद अहिल्यानगर मध्ये झाली होती. हवामान विभागाच्या माध्यमातून थंडीची लाट येईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली होती. मात्र, फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा हवेतील वातावरणावर झाला.
त्यामुळे रविवारी 12 तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस व सोमवारी किमान तापमान 21 तर कमाल 28 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले व तापमानात नऊ अंशाने वाढ झाल्याचे दिसून आले. चक्रीवादळाचा परिणाम होऊन थंडी देखील आता कमी झाली आहे व दोन दिवसात सहा अंशांनी तापमान घसरले आहे. यामुळे काहीसा उकाडा देखील वाढला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन देखील झाले नाही. पुढील तीन दिवस शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.