अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील केडगाव बायपास परिसरात एका मालवाहू ट्रकमधून सुमारे 78 लाख 82 हजार 184 रूपये किमतीच्या कापडाच्या रोलची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एसटीएस ट्रान्सलॉग सोल्युशन कंपनीचे व्यवस्थापक अमरीशकुमार ओमप्रकाश गुप्ता (वय 57, रा. अहमदाबाद, गुजरात) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी (22 मार्च) फिर्याद दिली असून, चालक आणि क्लिनर विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक संजय लिलाधर कुमार (रा. बलाराम सिकर, राज्यस्थान) व क्लिनर लिलु मिना ऊर्फ नंदलाल मिना (रा. चोडी मियागाव, बलाराम, सिकर, राज्यस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अहमदाबाद येथून बेंगलोरला कापडाचे 555 रोल घेऊन निघालेला ट्रक(जीजे 27 एक्स 5935) अहिल्यानगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे आढळले. कंपनीचा दुसरा चालक सीताराम याने संबंधित ट्रकचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून मालकाला माहिती दिली. गुप्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता 555 पैकी तब्बल 470 कापडाचे रोल गायब असल्याचे दिसले.
या गुन्ह्यात गाडीचा चालक संजय लिलाधर कुमार आणि क्लिनर लिलु मिना ऊर्फ नंदलाल मिना यांनी संगनमत करून कंपनीचा विश्वासघात केला आहे. आर्थिक फायद्यासाठी त्यांनी या मालाची परस्पर विल्हेवाट लावली असून सध्या दोघांचेही मोबाईल फोन बंद आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




