Tuesday, February 3, 2026
Homeनगरचांदा परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतीपिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

चांदा परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतीपिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

चांदा । वार्ताहर

नेवासा तालुक्यातील चांदा, बऱ्हाणपूर आणि परिसरातील गावांमध्ये पावसाळ्यातील पहिल्याच मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली गेली असून, नद्या-नाल्यांना मोठा पूर आला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरू झाल्यापासून चांदा, बऱ्हाणपूर, कवठा, पिंपळगाव, रास्तापूर, लोहारवाडी, महालक्ष्मी हिवरा, देडगाव यांसारख्या गावांमध्ये अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, परतीच्या प्रवासाला लागलेल्या पावसाने गुरुवारी रात्री १२ वाजता सुरू होऊन पहाटे साडेतीन-चार वाजेपर्यंत जोरदार हजेरी लावली. अवघ्या साडेतीन-चार तासांत झालेल्या या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

YouTube video player

चांद्यातील कौतुकी नदीला मोठा पूर आला असून, नदीवरील सर्व बंधारे ओसंडून वाहत आहेत. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. बऱ्हाणपूर येथील खारी आणि भारबोडी नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणीही मोठा पूर आला आहे.

या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. चांदा-घोडेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यातच, पुलाच्या नळ्यांमध्ये लाकडं अडकल्याने पाणी पुलावरून वाहत होते. चांदा ग्रामपंचायतीचे सरपंच रावसाहेब दहातोंडे आणि तलाठी श्री. बोरुडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने अडकलेली लाकडे काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. याचप्रमाणे, चांदा-कुकाणा रस्त्यावर कवठाजवळच्या नाल्यालाही पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काढणीला आलेला सोयाबीन, मका, तूर, लाल कांदा पाण्याखाली गेला आहे, तर वेचणीस आलेला कापूस जमिनीवर पडला. यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेल्याचे चित्र आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे उत्पादन घटले होतेच, पण आता उरलेलेही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

नद्यांना पूर आल्याने आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने चांदा आणि परिसरातील शाळांनी विद्यार्थ्यांना ‘शाळेत येणे शक्य असेल तरच यावे, अन्यथा घरीच सुरक्षित राहावे’ असे संदेश सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत आले नव्हते.

दरम्यान, प्रशासकीय नोंदीनुसार चांदा परिसरात ८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तलाठी श्री. बोरुडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू झाली असून, लवकरच पंचनामे केले जातील, असे सांगितले. नेवासा तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...