विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालंय. त्यानंतर आता शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडतंय. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या अधिवेशनाला हजेरी लावलीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. ज्याप्रकारे ही लढाई तुम्ही समोरून लढलात त्याबद्दल तुमचे आभार. तसेच आधुनिक भारतातील चाणक्य असं म्हणत अमित शाह यांचेंही आभार मानले.
हे अधिवेशन शिर्डीत घेतल्यामुळे खूप आनंदी आहे. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय. तो भाजपात महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम ही श्रद्दा असून मी अंत ही सबुरी आहे. ज्यांना हा मंत्र समजला त्यांचं कल्याण झालं, ज्यांना नाही समजला त्यांची अवस्था बुरी झाली, असं म्हणत विरोधकांना नाव न घेता टोला लगावला.
येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे, त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं.