मुंबई | Mumbai
कोल्हापुरमधील नांदणी गावातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जोरदार मागणी केली जात आहेत. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत महादेवीला कोल्हापूरमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ठरले आहे.
३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे. ही हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल आणि तसे सर्वोच्च न्यायालयात सांगितले जाईल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला आश्वस्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मंत्रालयामध्ये सुरू असलेल्या या बैठकीकडे नांदणी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर या बैठकीतून महत्वाचा निर्णय आला. सरकार नांदणी गावासोबत असल्याचे कळताच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे नांदणी ग्रामस्थांनी स्वागत केले खरे पण काही ग्रामस्थांनी सरकारने निर्णय घ्यायला उशिर केला असल्याचे मत मांडले. या बैठकीला राजू शेट्टी देखील उपस्थित राहिले.
आजच्या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, गणेश नाईक, पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विनय कोरे, सतेज पाटील, अमल महाडिक, विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राहुल आवाडे, सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह सागर शंभुशेटे, भालचंद्र पाटील, आप्पासो भगाटे, डॉ. सागर पाटील, अॅड. मनोज पाटील, वनविभागाचे सचिव, वन्यजीवचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख, वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार देखील यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयानंतर नांदणी गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आज गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेत. गडहिंग्लज इथल्या दसरा चौक परिसरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
राजू शेट्टी काय म्हणाले?
राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, “पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने कशाप्रकारे बनाव करुन सर्वच हत्ती वनताराकडे जाण्यासाठी प्रयत्न केले ते आम्ही कागदपत्रांसह दाखवून दिले आहे. जर माधुरी शारिरीकदृष्ट्या फिट आहे यासंदर्भात वेगवेगळे ८ रिपोर्ट असताना, ४८ तास प्रवास करुन तिथे पोहोचल्यानंतर अनफिट कशी झाली. तिला संधिवात, फ्रॅक्चर कसे झाले? याचे उत्तर शासनाने वनताराकडून घ्यावे अशी मागणी आम्ही केली आहे”.
वनतारा आणि पेटा हे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. अजित पवार आणि माझी महिती हीच आहे. राज्यातून गेलेले काही हत्ती हयात नाहीत. न्यायव्यवस्थेला चुकीची महिती देऊन सीमा भागातले देवस्थानातील हत्ती नेले जात आहेत. मुख्यमंत्र्यानी माधुरी हत्तीणीसाठी पुन्हा मठाच्या वतीने या याचिका दाखल करावी, त्याला सरकारही पार्टी राहील असे सांगितले. शासनाने आधी जागे झाले नाही. जनता रस्त्यावर उतरल्यावर शासन जागे झाले आहे. हिमालयाच्या कुशीतून अनेक हत्ती नेले आहेत. माझा पत्राचा जो उल्लेख होतोय ते २०११ चे आहे. तिचा जो माहुत होता तो आजारने त्रस्त असल्याने दुसरा माहुत येईपर्यंत तिचीव्यवस्था व्हावी या अनुषंगाने ते पत्र होते. मुख्यमंत्री जरी आश्वासन देत असले तरी जोपर्यंत हत्तीण परत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




