मुंबई | Mumbai
शरद पवार हे येत्या 12 डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राजकारणातून निवृत्ती जाहीर करतील, असे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शरद पवार हे निवृत्त झाल्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ही भाजपप्रणित ‘एनडीए’त सहभागी होईल, या अनुषंगाने हालचाली सुरु असल्याचेही बोलले जात आहे. या सगळ्याबाबत राज्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मंगळवारी (२४ नोव्हेंबर) नागपूरमधील कामठी येथे आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २७ व्या वर्धापन दिन महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘एक गोष्ट सांगतो, शरद पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभावं, ही आमची सर्वांची इच्छा आहे. पवार साहेब आजही सक्रिय आहेत. मी पवार साहेबांना जवळून पाहिलं आहे. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि कामांमध्ये रुची घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणं योग्य नाही. ते आपल्या आयुष्यात कधीच थांबणार नाहीत. मला विश्वास आहे, ते काही ना काही सकारात्मक करत राहतील.’
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याबाबत अशा निवृत्तीच्या बातम्या येणं अत्यंत संतापजनक आहे. ते निवृत्त होणार नाहीत; त्यांच्या राज्यसभेचा अजून ५ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे, मग ते कसे निवृत्त होतील? कोणी निवृत्त व्हायचं, हे जनता ठरवेल, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड
शरद पवारांच्या निवृत्तीच्या काय चर्चा आहे?
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती करावी व त्यांच्या जाहीर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’त सहभागी व्हावे यावर त्यांच्या पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. शरद पवार हे 12 डिसेंबर रोजी 86 वर्षांचे होत आहेत. सहा दशकांहून अधिक काळ ते राजकारणात आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदापासून अनेक पदे त्यांनी भूषविली. वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यास आतापर्यंतच्या भूमिकेला तो मोठा छेद असेल. हे टाळायचे तर त्यांनी निवृत्ती घ्यावी व त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा अशा शक्यतेची चाचपणी केली जात आहे. नेमका निर्णय काय घ्यायचा हे अद्याप ठरलेले नाही. भाजपच्या नेतृत्वाशीही पक्षाच्या काही नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचंही वृत्तसंस्थेने लिहलं आहे. ‘आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी शरद पवार यांना फोनवर म्हटले होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी यांनी हा फोन केला होता. पवार यांच्या निवृत्तीचे स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिले, असा त्याचा अर्थ काढला गेला होता.




