नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषद (Zilla Parisahd) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) नागपूर येथे भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आणि असहकार आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) चे राज्याध्यक्ष अॅड. बाबुराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली २२ नोव्हेंबर रोजी ही बैठक पार पडली. राज्यातील २५ जिल्हा परिषदांमधील युनियनचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तीव्र भावना व्यक्त करत शासनाच्या उदासीन धोरणावर नाराजी व्यक्त केली.
बैठकीत (Meeting-) पदोन्नती, वेतनश्रेणी, जुनी पेन्शन योजना, अनुकंपा नियुक्त्या, वेतनातील त्रुटी आणि रिक्त पदांची भरती अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यकांच्या पदोन्नती स्तराबाबत तातडीने निर्णय घेणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून एस-१५ वेतनश्रेणी लागू करणे, तसेच सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांना वर्ग-दोन राजपत्रित दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.
अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने कराव्यात, वाहनचालक व शिपाई पदांची पूर्वीप्रमाणे भरती करावी, कंत्राटी पद्धत रद्द करावी आणि आकृतिबंधात कोणत्याही विभागातील पदे कमी करू नयेत, अशी भूमिका मांडण्यात आली. केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची थकबाकी, लेखा संवर्गातील प्रश्न, वेतन त्रुटी दूर करणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-दोनमधील पदोन्नतीचा कोटा ३० टक्के करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांची ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा नागपूर येथे भव्य मोर्चा काढण्यासह काम बंद व असहकार आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस आंदोलन उभारण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक बलराज मगर, सुनील जानोरकर, विजयकुमार हळदे, रामचंद्र मडके, सुभाष कराळे, अरविंद अंतुरकर, विजय तांदूळकर, सुरेश म्हात्रे, मेघराज निमसे, लेखा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रेमानंद तलवारे यांच्यासह राज्य व जिल्हा शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिकमधून (Nashik) राज्य कोषाध्यक्ष विजयकुमार हळदे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र थेटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत कवडे, कार्याध्यक्ष राजेश आहेर, उपाध्यक्ष श्रीरंग दीक्षित व शालिग्राम उदावंत यांनी सहभाग घेतला.




