पुणे | Pune
मराठी साहित्यविश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, आतापर्यंत वेगवेगळी नावे चर्चेत होती. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचं नाव आघाडीवर होतं. अखेर त्यांच्या नावावर निवड समितीने पसंती दर्शवली असून, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजता आयोजित पत्रकार परिषदेत शरणकुमार लिंबाळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्याचे नियोजन आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या शंभराव्या वर्षाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशक आणि वाचकांमध्ये या संमेलनाबद्दल विशेष उत्सुकता आहे.
दलित साहित्यिक म्हणून त्यांची ओळख असली तरी, त्याही पलिकडे जाऊन त्यांच्या लिखाणाला देशपातळीवर मान्यता मिळाली आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची ओळख आंबेडकरवादी साहित्यिक, कवी, कादंबरीकार आणि ज्येष्ठ समीक्षक म्हणून महाराष्ट्राला आहे. ‘अक्करमाशी’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र देशभरात प्रसिद्ध आहे.
कोण आहे डॉ. शरणकुमार लिंबाळे?
डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील आघाडीचे आंबेडकरवादी साहित्यिक, कवी, कादंबरीकार आणि ज्येष्ठ समीक्षक आहेत. एका छोट्या गावातील संघर्षमय बालपणापासून ते भारतातील सर्वोच्च साहित्य सन्मानांपैकी एक असलेल्या ‘सरस्वती सन्मान’ पर्यंतचा त्यांचा प्रवास मराठी आणि भारतीय दलित साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यांनी ४० हून अधिक पुस्तके लिहिली असून, त्यांचे साहित्य विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दल पुन्हा एकत्र; अमित शाहांची युतीची घोषणा
सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर येथे १ जून १९५६ साली त्यांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी मराठी विषयाती एम.ए आणि पीएच.डी ही पदवी प्राप्त केली. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्यातील आत्मकथा, कादंबरी, कविता, कथा, समीक्षा आणि वैचारिक लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून दलित समाजाचे वास्तव, जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, संघर्ष, मानवी प्रतिष्ठा आणि परिवर्तनाची भूमिका प्रभावीपणे मांडली गेली आहे.
डॉ. लिंबाळे यांनी ५० वर्षांत ४० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र साहित्य जगतात प्रसिद्ध झाले, वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी लिहिले होते. अक्करमाशी या आत्मचरित्राचा इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. २०११ साली आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषवले होते. तर, 2019 साली रा.ग. जाधव साहित्या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. तसेच सनातन कादंबरीसाठी बिर्ला फाऊंडेशनच्या सरस्वती पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. दरम्यान, आता पुण्यात होणाऱ्या १०० व्या अ.भा.म.सा.संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिकशी खास नाते
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाशिकशी खास नाते जोडले गेले आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रदीर्घ काळ सेवा बजावली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या प्रकाशन विभागात ‘सहाय्यक संपादक’ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे प्राध्यापक व संचालक पदावरून ते निवृत्त झाले.
तसेच, नाशिकमधील वास्तव्यात आणि सेवेत असताना त्यांनी शहरातील अनेक साहित्यिक चळवळी, चर्चासत्रे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून नाशिकच्या सांस्कृतिक विश्वात त्यांची स्वतंत्र ओळख आहे.




