मुंबई | Mumbai
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेच्या सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. तेव्हापासून ते वादात सापडले असून, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला रमी खेळताच येत नाही असे सांगितले. तसेच आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही कोकाटे यांनी दिला.
दुसरीकडे या पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी शेतकऱ्यांकडून (Farmer) एक रुपया शासन घेते. शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही. पण, त्याचा अर्थ उलटा केला. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि त्या पिकविम्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या. आतापर्यंत कमीत कमी ५२ जीआर निघाले, इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत, असे त्यांनी म्हटले होते.
ते पुढे म्हणाले की, “मी कृषी विभागात (Department of Agriculture) इतके नवीन कामे केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. मी शेतात आणि बांधावर जाऊन आलो आहे. अनेक संशोधन केंद्रात गेलो, ज्या संशोधन केंद्रात सुविधा नाहीत तिथे त्यांना सुविधा पुरवण्याचे मी आश्वासन दिले आहे. आतापर्यंत एकही कृषिमंत्री संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठाला जाऊन भेटी दिल्या. शेतकऱ्यांशी जाऊन भेटलो, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे जीआर काढले. प्रत्येक गावात हवामान केंद्र तयार व्हावे, ही देखील माझीच मागणी आहे” असेही कोकाटे यांनी सांगितले.
तसेच “शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय-काय करता येईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल? यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. पुढील सहा महिन्यात कृषी विभागात मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलेला आहे, असा नंबर आपोआप येतो का? असा सवालही यावेळी कोकाटे यांनी उपस्थित केला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे या विधानावरून कान टोचले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी टोचले कोकाटे यांचे कान
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शेतकरी भिकारी नाही, तर शासन भिकारी आहे’, या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावरून त्यांचे कान टोचले आहेत. ते म्हणाले की, ” त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. तथपी मंत्र्यांनी असे विधान करणे चुकीचे आहे. देशातील कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या राज्याची अर्थव्यवस्था अतिशय उत्तम आहे”, असे फडणवीस यांनी म्हटले.
तसेच पीकविम्याची पद्धती पदलण्याचा आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. कारण आपल्या लक्षात आले की शेतकऱ्यांना काही वर्षे फायदा झाला. पण बहुसंख्य वर्षांमध्ये पीकविम्याचा फायदा कंपन्या घेत आहेत. पीकविम्याची ही पद्धत बदलत असताना आपण शेतकऱ्यांना मदत तर करूच शिवाय ५००० कोटी रुपये आपण दरवर्षी शेतीमध्ये गुंतवू असाही निर्णय घेण्यात आला. त्याची यावर्षीपासून अंमलबजावणी चालू झाली आहे, असेही फडणवीस म्हणाले. ते गडचिरोलीत एका कार्यक्रमात बोलत होते.





