पुणे | Pune
सध्या देशभरात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावरील छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास त्यामुळे संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आले आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ (करमुक्त) करण्याची मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून केली जात आहे. दुसरीकडे काही अभिनेत्यांकडून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे.
तसेच विकिपीडियावरही वादग्रस्त मजकूर टाकण्यात आला होता. या घटना समोर आल्यावर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आक्रमक भूमिका घेत अशा लोकांना राज्य सरकार कधीच माफ करणार नाही असा इशारा दिला होता. यानंतर आज पुण्यात (Pune) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला असता “अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. पण अशा प्रकारे जर कुणी वागत असेल तर सरकार माफ करणार नाहीच शिवप्रेमी देखील त्यांना माफ करणार नाही”, असे त्यांनी म्हटले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) आम्हाला समतेचा संदेश दिला. अठरापगड जातींना एकत्रित करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्य कारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्य कारभार करत आहोत”, असे त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. परंतु, दोन्ही उपमुख्यमंत्री (DCM) पुण्यातील (Pune) कार्यक्रमाला त्यांच्यासोबत आलेले नव्हते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री (CM) म्हणाले की,”त्या दोघांचेही वेगवेगळे कार्यक्रम होते. ते माझ्याबरोबर पुण्यापर्यंत आले होते. त्यानंतर ते पुढे आपापल्या कार्यक्रमांना गेले, असेही फडणवीस यांनी म्हटले.
छावा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यावर फडणवीस काय म्हणाले?
छावा चित्रपट राज्यात करमुक्त होईल का असे माध्यम प्रतिनिधींनी फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की,”छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. छत्रपती संभाजी महाराजांवर अतिशय चांगला इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता ऐतिहासिक सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्याबद्दल मी सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचे मनापासून अभिनंदन करतो. हा चित्रपट करमुक्त करा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण महाराष्ट्रात २०१७ मध्येच करमणूक कर कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्याकडे चित्रपटावर (Movie) कर नाही”, असे त्यांनी म्हटले.