नवी दिल्ली | New Delhi
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री
धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे नाव आल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत काही पुरावे सादर करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. फडणवीस हे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की,”धनंजय मुंडे (Dhananjay Munde) त्यांच्या कामानिमित्त दिल्लीला आले, मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. काल सकाळी आमची कॅबिनेटमध्ये भेट झाली होती. मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री असून त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात, मी त्यांना कधीही भेटू शकतो, कुठल्याही कामासाठी भेटू शकतो. त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादा जी भूमिका घेतील तीच अधिकृत भूमिका असेल”, असे यावेळी त्यांनी सांगितले.
तसेच “आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात (Budget) महाराष्ट्राच्या (Maharashtra) अपेक्षा काय आहेत त्या केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिल्या आहेत. त्याबाबत दिल्लीत (Delhi) चर्चा झाली असून यासंदर्भात खासदारांची बैठक झालेली नाही. त्यामुळे ती बैठक आम्ही लवकरच घेणार आहोत.ही बैठक खासदारांनी महाराष्ट्राचे प्रश्न केंद्रात मांडावे यासाठी होते. अलिकडे खासदार त्यांचेच प्रश्न आमच्यासमोर मांडतात. त्यात काही चूक नाही, पण त्या बैठकीचे स्वरुप बदलले आहे. त्यामुळे त्या बैठकीचा संबंध अधिवेशनाशी राहिला नाही”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील कागदपत्रे सुपूर्द करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, “अंजली दमानिया यांनी काही कागदपत्रं माझ्याकडे दिली, ती मी पाहिली. जी काही घटना बीडमध्ये घडली आहे, त्यासंबंधी चौकशी सुरु आहे. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तशा पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. आणखी काही नावे आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही. पण जर संबंध असेल तर निश्चित कोणाला पाठीशी घातले जाणार नाही. हीच भूमिका मुख्यमंत्र्यांसह आमची आहे”, असे अजित पवार यांनी सांगितले होते.