मुंबई | Mumbai
आगामी विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीला मोठा फायदा झाला. यावरुन शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर निवडणुकीतील हा घोडेबाजार रोखण्यासाठी आपण लोकसभेत विधेयक मांडणार असल्याची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात. हे जर तुम्हाला समजलं तर अशाप्रकारचे बिल मांडण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माणसं पैशांपेक्षा प्रेमाने जिंकता येतात
यापुढे पैशांच्या जीवावर कोणी निवडून येऊ नये, म्हणून मी लोकसभेत बिल मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी एवढंच म्हणेन की, माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे तुम्हाला समजलं तर असं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे, यासंदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर माझी हरकत नाही. माझंही मत आहे की, निवडणूक प्रक्रियेत परिवतर्न झालं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Supriya Sule: भाजपने मला तोंड उघडायला लावू नये…; विधान परिषदेतील घोडेबाजारावर सुप्रिया सुळेंचा संताप
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विधानपरिषदेतील ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्याही माघारीबाबत भाष्य केले. बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. मुख्यमंत्री निर्णय करत नाहीत, प्रदेशाध्यक्ष करतात तो निर्णय मला मान्य असेल. बाळ माने हे आमचेच होते. रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
“नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यासंदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. आम्ही तो पाठपुरावा पूर्ण करून नामकरण करून घेऊ,” असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.




