Wednesday, June 10, 2026
HomeनगरAhilyanagar : गरिबांचा पैसा खाणार्‍यांना जेलची हवा!

Ahilyanagar : गरिबांचा पैसा खाणार्‍यांना जेलची हवा!

सिस्पे घोटाळ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा थेट इशारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सिस्पे, इन्फिनिटी, ग्रो मोअर यांसारख्या कंपन्यांच्या नावाखाली जादा परताव्याच्या आमिषाने पैसे गोळा करून हजारो गोरगरीब नागरिकांची कोट्यवधींची लूट करणार्‍यांना आता कुठलीही माफी नाही. गरीबांचा पैसा खाणार्‍यांना जेलची हवा खायला लावणार असा थेट आणि सडेतोड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (8 जानेवारी) अहिल्यानगरमध्ये दिला. सिस्पे आर्थिक घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीच्या वतीने पांजरपोळ मैदानावर आयोजित प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर सभेत सिस्पेसह जिल्ह्यातील इतर आर्थिक घोटाळ्यांचा मुद्दा ठामपणे मांडत सीबीआय चौकशीची जोरदार मागणी केली. ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात सिस्पे व तत्सम आर्थिक घोटाळ्यांमध्ये गोरगरीब, कामगार, शेतकरी अशा हजारो लोकांचे सुमारे पाच हजार कोटी रूपये अडकले आहेत. हे केवळ आर्थिक नुकसान नसून हजारो कुटुंबांच्या आयुष्याशी केलेली क्रूर फसवणूक आहे.

या घोटाळेबाजांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी स्थानिक पातळीवर न थांबवता केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावी, अशी भूमिका मांडली. बुधवारी (7 जानेवारी) देखील त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत बैठक घेऊन घोटाळ्यांची सविस्तर माहिती घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, गुंतवणूकीच्या नावाखाली गरीबांची फसवणूक करणारे कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाहीत. सीबीआय चौकशी करून त्यांना जेलमध्ये पाठवले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेनंतर सभेत उपस्थित असलेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.

गुंतवणूकदारांचे निवेदन
यावेळी गुंतवणूकदारांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या घोटाळ्यातील संशयित आरोपी हे खासदार नीलेश लंके यांच्यासोबत फिरत असल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे अडकलेल्या पैशांमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे असून सीबीआय चौकशीमुळे तरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दानपेट्या फाेडणारा गजाआड; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला (Criminal) गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक (Arrested) केली आहे....