शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
परभणी आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांतील तणाव आपल्या सर्वांना मिळूनच शांत करावा लागणार आहे. बीड जिल्ह्यात समाजात दुफळी पाहायला मिळते. तसेच परभणीतही आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळते. हे दोन्ही भाग शांत झाले पाहिजे तसेच जी दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिर्डीत प्रदेश भाजपचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत दाखल झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी साई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. शिर्डीत भाजपाच्या होणार्या महाविजय अधिवेशनासाठी राज्यातील सर्वच भाजपाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानणार आहोत. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीची दिशा देखील या अधिवेशनातून देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.