मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा मर्यादित वापर, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य, वर्षभर सोन्याची खरेदी टाळा, स्थानिक उत्पादनांचा (स्वदेशी) वापर वाढवण्यावर भर द्या, परदेश दौरे करू नका, असे आवाहन देशातील नागरिकांना केले आहे. ऐवजी मेट्रो, इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच वर्क फ्रॉम होम, खाद्य तेलाचा वापार कमी करणे, विदेशात जाणं टाळावं, अशादेखील सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा ताफा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्र्यांच्या ताफ्यात अनेक वाहने असतात. पण आता इंधनाचा वापर जपून करायचे असल्याने आता ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसेच मंत्री असो किंवा बडा अधिकारी, त्यांच्या विदेश दौऱ्यावर तात्पुरते निर्बंध घातले जाणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
…तर किमान थट्टा मस्करी तरी करु नका
“मला विरोधी पक्षांना सांगायचं आहे, ज्यावेळी जागतिक संकटाची परिस्थिती असते, त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांनी काही उपाययोजना सांगितल्या त्या तुमला करता येत नसतील तर किमान थट्टा, मस्करी तरी करु नका. आज जगासमोर संकट आहे. भारतासमोर नाहीय. म्हणून आपलं परकीय चलन वाचलं पाहिजे. आपल्या इथे महागाई वाढू नये या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी याांनी सांगितलेल्या आहेत, प्रत्येक व्यक्तीला थोडी जीवनशैली बदलली तरी आपण देशाला मदत करु शकू. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानुसार सहा महिने जरी जीवनशैली बदलली तरी दिलासा मिळेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “विरोधी पक्षाने कितीही थट्टा मस्करी केली, तरी वैश्विक संकटात आपण देशाच्या पाठिशी उभे राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले.
प्रत्येकाने जीवनशैली थोड्या पद्धतीने बदलली तरी देशाला मदत होईल
“प्रत्येकाने आपापल्या स्तरावर शक्य त्या पद्धतीने हे उपाय अंमलात आणले पाहिजेत. महाराष्ट्र सरकारने देखील सुरक्षेच्या मुद्द्यावर असो, किंवा परदेश प्रवासाबाबत असो किंवा परकीय चलनाबाबतच्या धोरणाबाबत असो, जे खर्च होत आहेत ते कमीत कमी कसे होतील याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबतची एक बैठक आम्ही बोलावली आहे. निश्चितपणे पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाने अशाप्रमाणेच महाराष्ट्रदेखील काम करणार आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली जीवनशैली थोड्या थोड्या पद्धतीने जरी बदलली तरीही त्यांनी देशाला खूप मदत होऊ शकेल. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे. मला खात्री आहे की आपले देशवासी मदतच करतील,” असे फडणवीस म्हणाले.
मंत्र्यांचे ताफे छोटे करतोय, विदेश यात्रांवर निर्बंध आणतोय
“महाराष्ट्रातदेखील आम्ही निर्णय केलेला आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे ताफे हे छोटे करतोय. अधिकारी असतील किंवा मंत्री असतील, त्यांच्या विदेश यात्रांवर निर्बंध आणतोय. ज्या गोष्टींमध्ये परकीट चलन कमी होतंय त्या गोष्टींची खपत कमी कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या देशी गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे काही एका दिवसांत होणार नाही. पण आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण पूर्ण करु शकतो. देशाच्या पंतप्रधानांनी केवळ सहा महिने मागितले असतील तर ते न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.




