पुणे | Pune
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटीप्रकरणात सीबीआय कारवाईला वेग आला असून नाशिकमधून काल दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिकमधून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आज पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून मनीषा वाघमारे (वय ४६) नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे. तिने अहिल्यानगरमधील संशयिताला मदत केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी एका महिलेला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेने विद्यार्थ्यांना संशयितांपर्यंत पोहोचवल्याचा संशय असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी महिलेला ताब्यात घेतले. अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला ही महिला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषाच करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत मनीषा वाघमारेचे फोन, लॅपटॉप आणि अन्य तांत्रिक उपकरणे जप्त केले आहेत. तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मनीषा आणि धनंजय लोखंडे यांच्यात झालेले WhatsApp चॅट्स आणि कॉल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषा वाघमारे हिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणातील नाशिकमधील संशयित शुभम खैरनारला घेऊन CBI टीम मध्यरात्री मुंबईकडे रवाना झाली आहे. CBI ने शुभम खैरनारचा नाशिक पोलिसांकडून ताबा घेतलाय. CBI कडून शुभम खैरनारची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचा शुभम आणि अहिल्यानगरचा धनंजय यांनी हे पेपर लीक करण्याचा कट रचला होता. धनंजयने कथितरित्या नीटचा पेपर शुभमला १० लाख रुपयांना विकला असल्याची माहिती आहे. त्यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे तो पेपर १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, सीबीआयने कारवाई सुरू केली असून नाशिक, पुणेसह हरियाण, राजस्थान, तेलंगणातही चौकशी केली जात आहे.




