सातारा | Satara
जिल्ह्यातील (Satara District) फलटण (Phaltan) येथील शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून भाड्याच्या राहत्या खोलीत गळफास घेऊन दि. २३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या करण्याआधी मुंडेंनी हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने, पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख केला. यातील बदने याने चार वेळा बलात्कार केला तर पोलिस कर्मचारी प्रशांत बनकरने शारिरीक आणि मानसिक छळ केला, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले.
या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Former MP Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि आमदार सचिन पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आज (रविवारी)फलटण दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून निंबाळकर आणि पाटील यांना क्लीनचीट दिली आहे. फलटणच्या मधुदीप हॉटेलसमोरील मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले,”आज मी इथे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. परवा आमची एका लहान बहीण डॉ. संपदा मुंडे यांचा अतिश्य दुर्दैवी मृत्यू झाला, त्या भगिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले होते. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत, त्यांना अटक केली आहे. त्यामधील जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा निर्णय आम्ही घेतला. मात्र, अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवले जाते तशाच प्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला. काहीही कारण नसताना रणजितसिंह निबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला.असे फडणवीस यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “या महाराष्ट्राला (Maharashtra) देवाभाऊ माहिती आहे. मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो. अशा बाबतीत मी कधीच पक्ष, जात, व्यक्ती आणि राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या भगिनीचा विषय आहे, तिथे मी कॉम्परमाईज करत नाही. मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम कोणी करत असेल, प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असेल तर ते सहन करणार्यांपैकी मी नाही. त्याला उत्तर देण्याऱ्यांपैकी मी आहे”, असेही फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.





