Sunday, October 25, 2026
Homeक्राईमKopargaon : कोपरगावात 44.28 लाखाचा गुटखा पकडला

Kopargaon : कोपरगावात 44.28 लाखाचा गुटखा पकडला

एकुण 69 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त || चालकाला अटक, सात आरोपी फरार

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने शनिवारी मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित गुटखा वाहून नेणारा आयशर टेम्पो (क्रमांक डी डी 01 ए ए 9545) पकडला. या कारवाईत 44 लाख 28 हजार रुपये किमतीचा गुटखा आणि 25 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, असा एकूण अंदाजे 69 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इंदूरहून अन्य ठिकाणी सुगंधित गुटख्याचा पुरवठा करण्यासाठी हा माल नेला जात असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील 509 क्रमांकाच्या ठिकाणी आयशर टेम्पो अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढला. तो जवळपास 12 किलोमीटर पुढे जाऊन महामार्गावरून खाली उतरला; मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव दिनेश रामचंद्र शर्मा असून, तो मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. या प्रकरणातील इतर सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये रवींद्र कुमार उर्फ जालीम सिंग (रा. इंदूर), दिलीप बदलानी (रा. जळगाव), सतीश जयस्वाल उर्फ लाला आणि सोहेल उर्फ नदीम (दोघे रा. संभाजीनगर), अक्षय भंडारी आणि धर्म सुपेकर (दोघे रा. जालना), तसेच लाला जयस्वाल (रा. संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

जप्त मुद्देमालाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटख्याचा पुरवठा करणार्‍या साखळीचा उलगडा करण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण गांगुर्डे, विजय पवार, अभिजित अरकल तसेच पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, अजिनाथ पाखरे, दीपक जाधव, बाळासाहेब गुंजाळ आणि विशाल तनपुरे यांचा समावेश होता. दरम्यान, कोपरगाव शहरातही प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आहेत. एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर शहरातील गुटखा विक्रेते आणि साठेबाजांवरही कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक, साठवणूक आणि विक्री यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून आणखी कठोर पावले उचलली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : संगमनेर, कोपरगाव, नगर आणि श्रीगोंद्याच्या हाती सत्तेची गणित!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीसाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच तालुकानिहाय सभासद मतदारसंख्येचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये...