Monday, October 26, 2026
HomeनगरAhilyanagar : कमी उस उतार्‍याचा शेतकरी, कारखान्यांना फटका!

Ahilyanagar : कमी उस उतार्‍याचा शेतकरी, कारखान्यांना फटका!

नगरमध्ये 15 कारखान्यांना गाळप परवाना || गाळप सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि पोषक थंडीचा अभाव यामुळे यंदा उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका साखर उतार्‍याला बसू लागला आहे. राज्यातील ऊस गाळप हंगामाने वेग घेतला असला, तरी सुरुवातीच्या टप्प्यात सरासरी साखर उतारा अवघा 6.40 टक्के नोंदविण्यात आला आहे. कमी वाढ झालेला आणि पूर्ण परिपक्वता न आलेला ऊस गाळपासाठी येत असल्याने साखर उत्पादनावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. परिणामी, अपेक्षित उतारा न मिळाल्यास शेतकर्‍यांना उसाचा योग्य मोबदला देताना कारखान्यांची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

राज्यात आतापर्यंत 77 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या कारखान्यांकडून आतापर्यंत सुमारे 26 ते 27 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, 6.40 टक्के सरासरी उतार्‍यानुसार सुमारे 16 लाख 70 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याचे अहवालात नमूद आहे. यंदा उसाची उपलब्धता कमी असून, पावसातील खंडामुळे उसाची उंची, जाडी आणि वजनावर परिणाम झाला आहे. त्यातच अपेक्षित थंडी नसल्याने उसातील साखरेचे प्रमाण वाढण्यासही अडथळे निर्माण झाले आहेत. 2026-27 च्या गाळप हंगामासाठी राज्यातील 212 साखर कारखान्यांचे प्रस्ताव प्रादेशिक साखर सहसंचालक स्तरावरून प्राप्त झाले होते.

यामध्ये 104 सहकारी आणि 108 खासगी कारखान्यांचा समावेश होता. छाननीनंतर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या स्तरावरून 80 सहकारी आणि 83 खासगी, अशा एकूण 165 कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवाने वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. विभागनिहाय गाळप सुरू केलेल्या कारखान्यांची संख्या पाहता कोल्हापूर विभागात 3, पुणे विभागात 11, सोलापूर विभागात 19, अहिल्यानगर विभागात 8, छत्रपती संभाजीनगर विभागात 11, नांदेड विभागात 17 आणि अमरावती विभागात एका कारखान्याने गाळप सुरू केल्याचे अहवालात नमूद आहे.

केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी 9.25 टक्के साखर उतार्‍याच्या आधारावर प्रतिटन 3 हजार 650 रुपये एफआरपी निश्चित केली आहे. मात्र, प्रत्यक्ष उतारा कमी राहिल्यास कारखान्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा करण्याचे आव्हान कारखान्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. कमी गाळप आणि कमी साखर उतारा यांचा एकत्रित परिणाम साखर उत्पादन, विक्री आणि कारखान्यांच्या आर्थिक गणितावर होऊ शकतो. दरम्यान, विविध मागण्यांवर निर्णय घेतल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये, तसेच उसाला योग्य दर द्यावा, अशी भूमिका घेत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कमी उतारा, मर्यादित ऊस उपलब्धता आणि दराचा प्रश्न अशा तिहेरी आव्हानांना यंदा साखर उद्योगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

15 कारखान्यांना गाळप परवाना
अहिल्यानगर जिल्ह्यात गाळप परवाने मिळालेल्या 15 कारखान्यांपैकी जवळपास सर्वच कारखान्यांनी गाळप सुरू केल्याची माहिती सहसंचालक साखर कार्यालयाकडून देण्यात आली. यामध्ये अगस्ती, घुले, गणेश, नागवडे, कर्मवीर काळे, मुळा, थोरात, कोल्हे आणि वृद्धेश्वर या सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तसेच स्वामी शुगर, प्रसाद शुगर, क्रांती शुगर, गंगामाई, अंबिकानगर आणि श्रीराम शुगर या खासगी कारखान्यांचाही समावेश आहे. यंदा जिल्ह्यात उसाची उपलब्धता आणि त्यातील साखरेचे प्रमाण या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे गाळपाचा वेग वाढला, तरी साखर उतार्‍यात अपेक्षित सुधारणा होते का, याकडे शेतकरी आणि साखर कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील...