दिल्ली । Delhi
डिजिटल विश्वात कधी काय व्हायरल होईल आणि कशाची लाट येईल, याचा नेम नाही. सध्या इंटरनेटवर एका आगळ्यावेगळ्या राजकीय पक्षाची जोरदार चर्चा सुरू आहे. रील्स, मीम्स, जोक्स आणि टीका-टिप्पण्यांच्या महापुरात एक नाव सध्या चांगलंच ट्रेंड होतंय, ते म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP). सुरुवातीला केवळ एक विनोद वाटणारा हा पक्ष आता सोशल मीडियावर अवघ्या काही तासांत लाखो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. पण या पक्षाची स्थापना का झाली आणि यामागचं नेमकं सत्य काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.
या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं देशातील एका न्यायलयीन सुनावणीशी जोडलेली आहेत. भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सुर्य कांत यांनी एका सुनावणी दरम्यान देशातील तरुणांची तुलना थेट ‘झुरळांशी’ (कॉकरोच) केली होती. “देशातील काही तरुण झुरळांसारखे आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही आणि ते कोणत्याही व्यवसायात टिकत नाहीत; त्यामुळे ते सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून यंत्रणेवर टीका करत फिरतात,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. संविधानाचा रक्षक मानल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाकडून झालेला हा सन्मानवजा अपमान देशातील सुशिक्षित तरुण वर्गाच्या मनाला लागला. या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि व्यवस्थेला आरसा दाखवण्यासाठी एका मराठी तरुणाने थेट ‘झुरळांच्या’ नावानेच पक्ष स्थापन करण्याचा धाडसी आणि उपरोधिक मार्ग निवडला.
या सॅटायरिकल म्हणजेच उपरोधिक पक्षाची स्थापना अभिजीत डिपके या मराठी तरुणाने १६ मे रोजी ‘X’ (ट्विटर) वरून केली. अभिजीत सध्या अमेरिकेतील नामांकित ‘बॉस्टन युनिव्हर्सिटी’मधून ‘पब्लिक रिलेशन्स’ (PR) या विषयात मास्टर्स करत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया टीममध्ये व्हॉलिंटिअर म्हणून काम केले असल्याने त्यांना डिजिटल जगाची नस उत्तम ठाऊक आहे. “जर यंत्रणेपर्यंत आमचा आवाज पोहोचवण्यासाठी आम्हाला ‘झुरळ’ म्हटले जात असेल, तर आम्हाला या ओळखीचा अभिमान आहे,” अशी स्पष्ट भूमिका अभिजीत यांनी मांडली आहे.
हा पक्ष केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नसून, याची अधिकृत वेबसाईट देखील सुरू झाली आहे. अवघ्या काही तासांत या पक्षाच्या ‘X’ हँडलला ३७ हजारांहून अधिक आणि इन्स्टाग्राम अकाउंटला तब्बल ३ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त युझर्सनी फॉलो केले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. पक्षामध्ये सामील होण्यासाठी काही गमतीशीर आणि उपरोधिक अटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्यानुसार, व्यक्ती अधिकृतपणे बेरोजगार असावा, २४ तास ऑनलाईन स्क्रोलिंग करण्याचे व्यसन असावे आणि सिस्टीमवर रीतसर राग व्यक्त करण्याची धमक त्याच्यात असावी.
‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या या पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात देशातील ज्वलंत मुद्द्यांवर थेट बोट ठेवले आहे
- कोणत्याही मुख्य न्यायमूर्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेचे पद दिले जाणार नाही.
- मतदारांचे वैध मत हटवल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांवर ‘UAPA’ अंतर्गत कारवाई केली जाईल.
- मंत्रिमंडळात आणि राजकारणात महिलांना ५०% आरक्षण दिले जाईल.
- खोटी माहिती पसरवणाऱ्या वृत्तमाध्यमांवर (Fake News) कठोर कारवाई होईल.
- पक्षांतर करणाऱ्या आमदार-खासदारांवर २० वर्षांची निवडणूक बंदी घातली जाईल.
थोडक्यात सांगायचे तर, ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे केवळ एक मीम नसून, लोकशाहीत तरुणांच्या आवाजाला केराची टोपली दाखवणाऱ्या प्रवृत्तींविरोधात डिजिटल युगातील तरुणांनी पुकारलेले हे एक अनोखे आणि शांततापूर्ण उपरोधिक आंदोलन ठरत आहे.




