नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या नाशिक ते नासा ज्ञानयात्री शैक्षणिक सफर उपक्रमांतर्गत आयोजित तालुकास्तरीय निवड चाचणी आज जिल्हाभरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये आयोजित या परीक्षेला एकूण १० हजार ७०० विद्यार्थी उपस्थित राहिले. परीक्षेची एकूण उपस्थिती ७६.५९ टक्के नोंदविण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित, भाषा आणि तार्किक विचारक्षमता विकसित व्हावी, तसेच ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक संधींचा अनुभव मिळावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेसाठी मराठी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता या चार विषयांवर आधारित १०० गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली.
परीक्षेसाठी व्यापक प्रशासकीय यंत्रणा कार्यरत
जिल्हाभरातील परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ३६ केंद्र संचालक, १८९ केंद्रप्रमुख आणि ५९८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात आली. परीक्षा व्यवस्थेचे योग्य नियोजन करून सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय निवड परीक्षा
तालुकास्तरीय परीक्षेतील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजी जिल्हास्तरीय निवड परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन आहे.
या उपक्रमासाठी तीन शिक्षकांचीही नासाच्या शैक्षणिक सफरीसाठी निवड करण्यात येणार असून, प्राप्त झालेल्या अर्जांमधून शिक्षक निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने जिल्हा परिषदेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




