Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्ह्यात थंडीची लाट कायम; हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट कायम; हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. निफाड तालुक्याचे तापमान ४.५ तर नाशिक शहराचे तापमान ६.९ अंशावर घसरले आहे. शहरासह जिल्हा वासीयांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत असून दोन दिवस थंडीची लाट अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

YouTube video player

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पारा झपाट्याने घसरत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हाडे गोठवणाऱ्या थंडीची लाट पसरली आहे. शनिवारी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात ४.५,रुई ४.७ तर नाशिकमध्ये ६.९ अंश सेल्सिअस इतइ किमान तापमान नोंदवले गेले. या मोसमातील हे नीचांकी तापमान ठरले असून किमान तापमानाचा नवीन रेकॉर्ड ठरला आहे.

या वाढत्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत होत असून पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिकच जाणवत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी नाले पाण्याने भरलेले आहे. थंडीमुळे या नदी नाल्यांच्या पाण्यावर धुक्याची चादर पसरत असून सकाळच्या वेळी पाण्यातून बाष्प निघत असल्याने नयनरम्य दृश्य अनुभवयास मिळत आहे.

वाढती थंडी द्राक्ष पिकासाठी नुकसान करणारी ठरू लागल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे मात्र, गहू, हरभरा यासारख्या रब्बी पिकांसाठी थंडी पोषक ठरणारी असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे चित्र सध्या दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणतेही मोठे बदल जाणवणार नाहीत. तर किमान तापमानात देखील पुढील ७ दिवस सध्याचीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या