नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध ‘सुपर ग्राहक बाजार’चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा निकाल लागला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने या खटल्यातील चार आरोपींना जन्मठेपेची (Life Imprisonment) आणि एकूण ११ लाख रुपयांच्या दंडाची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती
सुनील रामचंद्र पवार, चिमा उर्फ सतीश नाना पवार, विलास राजू मिरजकर आणि नारायण उर्फ आप्पा रामप्रसाद बसनेत अशी आरोपींची नावे आहेत. ८ जानेवारी २०१९ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. अविनाश शिंदे हे आपले दुकान बंद करून ४ वर्षाच्या मुलासह दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटकडे जात होते. त्यांच्याकडे व दुकानातील दिवसभराच्या विक्रीचे सुमारे ६ लाख रुपये असलेली बॅग होती.
इंदिरानगरमधील पाथर्डी रोडवरील गणधिराज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आरोपींनी आधीच दबा धरून बसले होते. शिंदे तिथे पोहोचताच आरोपींनी त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेत त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात शिंदे यांचा मृत्यू झाला. आरोपींनी गुन्ह्यासाठी दुचाकी आणि अॅक्टिव्हाचा वापर करून पळ काढला होता. एका व्यापाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने शहरात प्रचंड रोष होता.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी
तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी तपासाचे आदेश दिले. तपासात विलास राजू मिरजकर याने संघटित टोळी बनवून हा गुन्हा केल्याचे समोर आले. आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी सुनील पवार याच्या कपड्यांवर मृताचे रक्त आणि डीएनए आढळले, जो खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरला.
चार वर्षांचा प्रत्यक्ष साक्षीदार
जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी हा निकाल दिला. विशेष सरकारी वकील अॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी एकूण ४३ साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी तिथे असलेला मृताचा ४ वर्षांचा मुलगा अभय हा या प्रकरणाचा मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला. चौघांना जन्मठेप आणि मोक्का अंतर्गत ११ लाख रुपयांचा दंड ठोठविण्यात आला असून दंडाच्या रकमेतून ५ लाख रुपये मृताच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Ravindra Erande Crime : एरंडेचा खरातप्रमाणेच अघोरी प्रथा, जादूटोणा; कार्यालयातून पक्ष्यांचे अवयव, सापाची कात, कवडी जप्त
मुद्दे
- पुराव्याअभावी किरण उर्फ गोठ्या रामदास म्हस्के याची निर्दोष मुक्तता.
- या खटल्यात सरकारी वकील रेश्मा जाधव आणि जगदीश सोनवणे यांनी सहकार्य केले, तर तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासाची भूमिका महत्त्वाची ठरली
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद





