शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी पोलिसांनी बुधवारी रात्री अवघ्या 10 तासांत कोंबिंग व मिसिंग शोध मोहिमेत 59 व्यक्तींचा शोध घेतला तर 32 व्यक्तींना नॉन बेलेबल वॉरंट व 20 व्यक्तींना बेलेबल वॉरंट तसेच 134 जणांना समन्स, 2 दारूबंदी केसेस फरार असलेले 3 आरोपींना अटक अशी सर्वात मोठी कारवाई शिर्डी पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी त्यांच्या सहकार्यांना बरोबर घेऊन केली असून एकच दिवशी सर्वात मोठी कारवाई शिर्डी पोलीस ठाण्याने प्रथमच केल्याने पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
शिर्डी शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात 7 वर्षात मिसिंग झालेल्या लोकांची शोध मोहीम राबवण्यात आली. त्यात पन्नासजण मिळून आले. एका दिवसात प्रलंबित मिसिंग फाईल बंद करण्यात आली. त्याबरोबरच गेल्या सहा वर्षांपासून फरार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यात रंगनाथ युवराज काळे (वय 36, रेणुका नगर, श्रीरामपूर), साबीर दिलावर शेख (वय 24, गोंधवणी रोड, श्रीरामपूर), राहुल हिरामण गायकवाड(चास, तालुका सिन्नर)यांचा समावेश आहे. त्याबरोबरच 32 अजामीन पात्र वॉरंटची बजावणी देखील करण्यात आली.
त्यात 7 पुरुष 3 महिला यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात आकाश चंदूसिंग परदेशी (रा. सावळीविहीर), अनिल रघुनाथ कचरे (रा. सावळीविहीर),राजू कैलास वासंडे (सावळीविहीर), विशाल उर्फ राजू कैलास वासंडे (सावळीविहीर),कुमार बाळासाहेब गायकवाड( शिर्डी), अमोल देविदास वाघ (सावळीविहीर) यांचा समावेश आहे तसेच राहाता न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या 124 समन्सची बजावणी करण्यात आली. त्याबरोबरच दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन केसेस दाखल करून 18465 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात युवराज भागीरथ गव्हाणे (रा. पिंपळवाड), किसन माधव पटेल (रा. म्हसोबा नगर, शिर्डी), या दोघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरच्या कारवाईत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे, सहाय्य पोलीस निरीक्षक भारत बलैया, अमित वाळके, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व 30 पोलीस कर्मचार्यांनी या कारवाईत भाग घेतला होता. एकाच दिवशी अवघ्या दहा तासांत प्रथमच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व त्यांच्या सहकार्याने गुन्हेगारांना पकडण्याची सर्वात मोठी कारवाई करून दाखवल्याने नागरिकांकडून शिर्डी पोलिसांचे कौतुक केले जात आहे.





